हुश्श..! गोलाणी मार्केटची पार्किंगची समस्या अखेर सुटणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । शहराचा मध्यवर्ती आणि अर्थकारणाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा भाग असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये पार्किंगची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मार्केटच्या बाजूच्या जागेचे नियोजन करण्यात आले आहे. पार्किंगच नाही तर हा संपूर्ण रस्ता कॉक्रीटचाच केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने तब्बल ६२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

गोलाणी मार्केटची मागील बाजू खाऊ गल्ली ते अग्निशमन दलाच्या कार्यालयापर्यंतचा रस्ता २०० मीटर लांबीचा व सरासरी १० मीटर रुंदीचा आहे.या जागेवर सध्या कचरा टाकला जातो, त्याशिवाय काही वाहने पार्किंग होतात. हा रस्ता विकसित करण्यासह तेथे पार्किंगचे नियोजन महापालिकेने केले आहे.

फुले मार्केट व गोलाणी मार्केट ही दोन मार्केट प्रमुख आहेत. येथे जिल्हाभरातून नागरिकांची वर्दळ असते. फुले मार्केटच्या समोर पार्किंगची व्यवस्था झाली आहे, तरीदेखील तेथे समस्या कायम आहेत. आता गोलाणी मार्केटची समस्या सोडविण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे. गोलाणी मार्केटच्या पाठीमागील भागाच्या कॉक्रिटीकरणाचा प्रस्ताव महासभेत मांडला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर मनपा फंडातून काम केले जाईल. खड्डे, घाणीने व्यापलेला रस्ता सुस्थितीत येणार असून करून कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. याच जागेत व्यावसायिक व ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाईल..