⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, काँग्रेसचा ‘हा’ जुना विक्रम मोडला

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळालेलं दिसून येतेय. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास भाजपला यंदा मिळत असलेलं यश हे सर्वात मोठं असल्याचं दिसून येतं. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजपा (BJP) उमेदवार १५४ जागांवर पुढे असून काँग्रेसही (Congress) २० जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येते. तर, आम आदमी पक्ष (AAP) ६ जागांवर आणि अपक्ष ४ जागांवर पुढे आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.

भाजपची राज्यात ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना काँग्रेसने आपल्या राजकीय इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी दाखवली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला सहा दशकात कधीच इतक्या कमी जागा मिळाल्या नाहीत. राममंदिर आंदोलन आणि आणीबाणीच्या काळातही काँग्रेसला गुजरातमध्ये इतका दारुण पराभव कधीच सोसावा लागला नव्हता.

मोदींच्या नेतृत्वात भाजपने १० वर्षे गुजरातची सत्ता राखली. तर, गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे कमळच सत्तेवर आहे. त्यानुसार, आत्तापर्यंतच्या विजयानुसार २००२ मध्ये गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक १२७ जागांवर विजय मिळाला होता. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विजय होता. मात्र, यंदा १५० जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा मोदी-शहांच्या नेतृत्त्वात भाजपने राजकीय चमत्कारच घडवला, असे म्हणता येईल.

२०१७च्या निवडणुकीत भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही थोडं दुर्लक्ष झालं होतं. २०१७मध्ये भाजपाला ९९ जागांवर समाधान मानावे लागले. जवळपास १६ जागा भाजपाने गमावल्या होत्या. तर काँग्रेसने मुसंडी मारत ७७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा म्हणजेच २०२२च्या निवडणुकीत भाजपासह नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत करत विजयासाठी रणनिती ठरवली होती. तसेच प्रचारात काँग्रेसने नरेंद्र मोदींना रावण असं संबोधलं होतं. त्याचा परिणामही दिसून आला. तसेच गुजरातमधील नागरिकांची नरेंद्र मोदींना आपुलकी मिळाल्यानेच यंदा भाजपा मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे.