शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जिल्ह्यात तुरीला मिळतोय तब्बल ‘इतका’ भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२३ । यंदाच्या मोसमात तुरीचे उत्पादन चांगलेच घटलेले पाहायला मिळत आहे. पार्यता अर्थशास्त्राच्या नियमानुसार तुरीला चांगला भाव मिळू लागला आहे. आठवडाभरात तुरीच्या भावात ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. सध्या तुरीला ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे भविष्यात तुरीची आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.

साधारणता जानेवारी महिन्यापासून नवीन तूर बाजारात येण्यास सुरुवात होत असते. मात्र यंदा तुरीचे प्रमाण कमी आहे. दरवर्षाप्रमाणे तूर बाजारात येत नसल्याने तूर भाव खात आहे. यंदा नवीन तुरीची आवक सुरू झाल्यानंतर तिला ६ हजार ३०० रुपयांपासून भाव मिळण्यास सुरुवात झाली. त्यात हळूहळू भाववाढ होत गेली. आठवडाभरात तर थेट ५०० रुपयांची वाढ झाल्याने तुरीचे भाव ७ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे.

यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेतकऱ्यांच्या हाती केवळ ६० ते ७० टक्केच उत्पादन आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तूर पेरल्यानंतर असणारी मोठी अपेक्षा धुळीला मिळाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तुरीची लागवड केल्यानंतर ती चांगली येणार असे सुरुवातीला वाटत होते. मात्र नंतर तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादन घटले आहे. तसे पाहता जळगाव जिल्ह्यात तुरीची लागवड कमीच असते. जिल्ह्यातील शेतकरी स्वतंत्र तुरीची शेती करीत नसल्याचे सांगण्यात आले. आंतरपिक म्हणूनच शक्यतो तुरीची लागवड होत असते. मुख्यत: मराठवाडा, विदर्भासह कर्नाटकमधून तूर येत असते.