युद्धाच्या काळातही सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; जळगावच्या सुवर्णनगरीमधील आताचे दर तपासून घ्या..

मार्च 9, 2026 12:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२६ । एकीकडे मध्य पूर्वेतील इराण -इस्राइल युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची चिंता असताना दुसरीकडे या युद्धादरम्यान सोनं-चांदीच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला. Gold Silver Rate

gold silver jpg webp

सोन्याचा दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर शनिवारी २१६३ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६६ हजार १३९ रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, आज सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडताच पुन्हा २०६० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ०७९ रुपयांपर्यंत घसरले.

चांदीचा दर

दुसरीकडे आज सोण्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण दिसून आली. जळगाव सराफ बाजारात आज सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडताच चांदीत सुमारे १० हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रुपयांपर्यंत घसरले. यापूर्वी शनिवारी (दि ७) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९२७० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर प्रति किलो दोन लाख ८३ हजार २५० रुपयांपर्यंत वधारले होते.

घसरणीमागचे कारण काय?

अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळण्याऐवजी अल्पकालीन जोखीम कमी करण्यावर भर देत आहेत. परिणामी काही गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील गुंतवणूक कमी करून विक्री सुरू केली. ज्यामुळे त्यांच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली. याशिवाय अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याचाही दोन्ही धातुंच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now