⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खुशखबर.. भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्वच गाड्यांना मिळणार जनरल तिकीट, कधीपासून? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. भुसावळ विभागातून जाणाऱ्या १६७ गाड्यांसाठी २९ जूनच्या मध्यरात्रीपासून जनरल तिकीट सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला तरी मात्र, पॅसेंजर गाड्या सुरु करण्याबाबत अद्यापही निर्णय झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना संकट कमी झाल्यानंतर हळूहळू रेल्वेने गाड्या सुरु केल्या होत्या. निर्बंधामुळे सर्व गाड्यांचे जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. जनरल बोगीमध्येही सिटींग आरक्षण तिकीट लागू करण्यात आले होते. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून महिनाभर आधी आरक्षण करण्यात येते. मात्र सध्या कोरोना कमी झाल्यानंतर जनरल तिकीट सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. अशातच आता मध्य रेल्वेने जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळ विभागातून धावणाऱ्या १६७ गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सामान्य तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच मासिक पासधारकांनाही सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान, २९ जूनच्या मध्य रात्रीपासून जनरल तिकिटाची सुविधा सुरू होत आहे. रेल्वे बोर्डाकडून इतर सवलतधारकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सुविधेबाबत तूर्त आदेश नसल्याचे डीसीएम यांनी सांगितले आहे.

एसी गाड्यांना सुविधा नाही
दरम्यान, संपूर्ण एसी गाड्या व राजधानी एक्स्प्रेसला जनरल तिकीटची सुविधा राहणार नाही. इतर सर्वच एक्स्प्रेस गाड्यांना जनरल तिकीटची सुविधा देण्यात आली आहे. मात्र पवन एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांसह १६७ गाड्यांना जनरल तिकीट मिळेल.

पॅसेंजर गाड्याबाबत अद्यापही निर्णय नाही
दरम्यान, जनरल तिकिटावर सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी भुसावळ येथून सुटणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरु करण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीय. त्यामुळे खेड्या-पाड्यावर जाणाऱ्या प्रवाशांची हिरमोड होत आहे. पॅसेंजर ऐवजी मेमू गाड्या चालवल्या जात असल्या तरी एक्सप्रेसचे भाडे प्रवाशांकडून आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे.