⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

पिंप्राळ्याच्या रथ सेवेकरींची गांधीगिरी, रथमार्गाची योग्य दुरुस्ती न झाल्याने मानले आभार!

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जळगावातील खड्डे जळगावकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. जळगावचा उपभाग असलेल्या पिंप्राळा परिसरातील रथोत्सव आषाढी एकादशीच्या दिवशी असतो. जळगाव शहराप्रमाणेच पिंप्राळा परिसरात देखील रस्ते खड्ड्यांनी व्यापलेले आहेत. रथ ओढण्यापूर्वी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांनी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना साकडे घातले होते. प्रशासनाने रस्ते दुरुस्ती केली देखील मात्र काम थूक लावून केल्याप्रमाणे केले. आपल्या विनंतीचा मान न ठेवल्याने पिंप्राळा परिसरातील प्रयास मित्र मंडळातर्फे रथमार्गावर खड्ड्यांचे फोटो असलेले बॅनर लावून सत्ताधाऱ्यांचे आभार मानले.

आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर संस्थान, पिंप्राळे वाणी पंच मंडळ व ग्रामस्थांच्या माध्यमातून दरवर्षी आषाढी एकादशीला श्री पांडुरंगाचा रथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. गेल्या तीन वर्षात जळगाव शहरात भूमिगत गटारी, अमृत योजनेची कामे झाली त्यातच अनेक वर्षापासुन रस्ते तयार न झाल्याने रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. पिंप्राळा रथोत्सव आषाढी एकादशीला होणार असल्याने तत्पूर्वी रथमार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. रथोत्सव आला तरीही तक्रारीची योग्य दखल न घेतल्याने नागरिकांनी वेगळी क्लुप्ती लढवली.

रथ ओढताना खड्डेमय मार्ग असल्यास प्रचंड अडचण होते. आज रथ ओढताना पिंप्राळा येथील प्रयास मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावात रथमार्गावर लावलेले बॅनर लक्ष वेधून घेत होते. नागरिकांनी पिंप्राळ्यातील रथ मार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करून दिल्याबद्दल महापौर, उपमहापौर व पिंप्राळा नगरातील सर्व नगरसेवकांचे जाहीर आभार अश्या प्रकारचे बॅनर बनवून रथ मार्ग दाखवून संताप व्यक्त केला आहे. बॅनरवर खड्ड्यांचे फोटो दाखविलेले असल्याने नागरिकांचा देखील संताप होत आहे. प्रयास मित्र मंडळातर्फे करण्यात आलेली हि गांधीगिरी हिट ठरली आहे.