⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

निर्णयावर शिक्कामोर्तब : महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात मोफत लसीकरण करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडेल.
सध्याच्या घडीला ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू आहे. हे लसीकरण मोफत सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं थोड्याच दिवसांपूर्वी घेतला. यानंतर देशातल्या अनेक राज्य सरकारांनी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे आरोग्य सुविधांवर होणारा खर्च, लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान यामुळे राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा बोजा पडेल, असा एक मतप्रवाह सरकारमध्ये होता. गरिबांना मोफत लस दिली जावी. ज्यांना परवडेल, त्यांनी त्यासाठी पैसे मोजावेत, असं काही मंत्र्यांचं मत होतं. तर अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण लसीचे पैसे आकारून लोकांची नाराजी ओढवून घेऊ नये, असं मत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केलं. अखेर मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला.