⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कैद्यांना दिली सूट, मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मोकळीक, चौघे पोलीस निलंबीत

कैद्यांना दिली सूट, मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मोकळीक, चौघे पोलीस निलंबीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या कैद्यांमध्ये रविवारी रात्री हाणामारी झाली होती. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. बंदी रुग्ण कक्षात कैद्यांना मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मुभा देणे चार पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. घटनेस जबाबदार तसेच कर्तव्यात बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निलंबित केले आहे.

निलंबीत केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पंडीतराव ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल पारस नरेंद्र बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल किरण अशोक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल राजेश पुरुषोत्तम कोळी यांचा समावेश आहे. खुनाच्या गुन्ह्यातील दशरथ बुधा महाजन रा.एरंडोल, सतीश मिलिंद गायकवाड रा. आंबेडकर नगर, जळगाव यांच्यासह पाच कैदी जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात दाखल झाले होते. रविवारी रात्री यापैकी दशरथ महाजन व सतीश गायकवाड दोन कैद्यांमध्ये वाद होवून हाणामारी झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे.

भांडण करणाऱ्या कैद्यांना शांत करण्यासाठी त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राजेश कोळी हे चावीने दरवाजा उघडून आत गेले. त्यावेळी आरोपी सतिष गायकवाड याने पोलिस कर्मचारी राजेश कोळी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. ‘तु आमच्या वादात पडू नको नाहीतर चाकूने तुझा मर्डर करुन टाकेन’, अशी धमकी सतीष गायकवाड याने दिली होती. तसेच कर्मचाऱ्याला लोटून दिले होते. वाद वाढल्याने बाहेरील देखील काही तरुण आल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. भितीने रुग्ण तसेच कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत सुटले होते.

या घटनेची पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गांभिर्याने दखल घेतली तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस कर्मचारी सतीश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी जिल्हापेठ पोलिसात कैदी सतिष मिलींद गायकवाड व त्याचे इतर मित्र आणि इतर नातेवाईकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांनी कैद्यांना मोबाईल वापरासह इतर मुभा दिल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा रुग्णालयात घटनेच्या दिवशी कर्तव्य बजावणारे चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना नियुक्त केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.