जळगाव लाईव्ह न्यूज । यंदाच्या मान्सूनवर ‘अलनिनो’चे सावट राहून पाऊस कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून हतनूर धरणातील जलसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. हतनूर धरणात महिनाभर आधीच ७०.८८ टक्के साठा उपलब्ध करून ठेवला आहे. यामुळे आगामी रब्बी आणि पाण्याच्या पाण्याची चिंता मिटली

हतनूर धरणाच्या पूर व्यवस्थापनाच्या नियमांनुसार २१ ऑगस्टपर्यंत धरणात ४६ टक्के जलसाठा ठेवणे अपेक्षित असते. मात्र, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, प्रशासनाने १२ ऑगस्ट रोजीच धरणात ७०.८८ टक्के साठा उपलब्ध करून ठेवला आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने ओढ दिली, तरी जळगाव जिल्ह्याला पाणीटंचाईची मोठी झळ बसणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण कमी असून धरणात होणारी आवकही जेमतेम आहे. त्यामुळे कमीत कमी विसर्ग करत धरणातील पाणीसाठा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. नियोजित वेळेच्या सुमारे महिनाभर आधीच ७०.८८ टक्के साठा झाल्याने उर्वरित हंगामातील पावसाचे प्रमाण कमी राहिले तरी जलसाठा नियोजनावर फारसा परिणाम होणार नाही.
रब्बी हंगामात तीन आवर्तने मिळणार
हतनूर धरणातून रेल्वे प्रशासन, भुसावळ व दीपनगर औष्णिक केंद्र, जळगाव व भुसावळ एमआयडीसी, मलकापूर एमआयडीसी, वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणी, भुसावळ व अमळनेर नगरपालिका यांच्यासह विविध ११० गावांना पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय रब्बी हंगामात धरणाच्या उजव्या कालव्यातून सुमारे ३७ हजार हेक्टर क्षेत्रासाठी तीन आवर्तने दिली जातात. यंदा धरणात वेळेआधीच समाधानकारक जलसाठा झाल्याने रब्बी हंगामातील सिंचनासाठीही अडचण येणार नसल्याचे चित्र आहे.
कमी पावसाचा अंदाज असतानाही हतनूर धरणात वेळेआधी मोठा साठा करण्यात आल्याने जळगाव, भुसावळ परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाला मोठा दिलासा मिळाला आहे.









