⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘जळगाव लाईव्ह’च्या पाठपुराव्यांवर सुकळी नियतक्षेत्रातील पाणवठे भरले

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । ऐन उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत आटल्यामुळे जंगलात वनविभागाकडून कुत्रिम पाणवठ्यात पाणी टाकणे आवश्यक असताना वनक्षेत्रातील सुकळी जंगलातील पाणवठे कोरडेठाक होते. दरम्यान २६ मार्च रोजी एक तहानलेला सांबर जातीचा नील पाण्याच्या शोधार्थ भटकत थेट गावात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला. तसेच या प्रकारामुळे स्थानिकांची पाणवठे भरण्यासाठी मागणी पुढे आली होती. दरम्यान या प्रकरणी ‘जळगांव लाईव्ह’ ने ‘पाण्याच्या शोधार्थ नीलगाय पोहचली थेट मानवी वस्तीत’ या मथळ्याखाली सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. वन्यप्राण्यांचा प्राणी प्रश्नांची गंभीरता सविस्तरपणे तंतोतंत मांडली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत वनविभागाकडुन पात्र कुत्रिम पाणवठ्यात टॅकरने पाणी सोडण्यात आले. तसेच गळके असलेले पाणवठ्यांची लवकरच दुरुस्ती करुन तेही भरले जाणार असल्याने वन्यप्राण्यांना या गंभीर प्रश्नांबाबत तुर्तास दिलासा मिळाला आहे.

प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव यांनी कर्मचाऱ्यांना सुचना देत वनपाल पी.टी.पाटील, वनरक्षक विकास पाटील, वनमुर संजय सांगळकर, अशोक पाटील यांनी पाणवठे भरण्याबाबत काम पाहिले. वनक्षेत्राला लागुन दक्षिण बाजुस पुर्णा नदीपात्र आहे. मात्र उत्तरेकडील जंगलात पाण्याचे कोणतेही नैसर्गिक स्रोत नसल्याने या भागात सिमेंट बांध, छोटे-मोठे तलाव यासारखी कामे होणे आवश्यक आहे. जेणेकरुन पाणी पातळी टिकवुन रहाण्यास मदत होईल. परंतु चालु वर्षात या भागात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासंदर्भातील एकही काम नाही यामुळे स्थानिकांची नाराजी आहे. कं.नं.५४० मध्ये दोन-तिन ठिकाणी सिमेंट बांध बांधण्यात यावे असे मत सुज्ञ नागरिक व वन्यजीव अभ्यासकांडुन वर्तविण्यात येत आहे तसेच वनविभाकडुन नादुरूस्त पाणवठ्यांची तातडीने दुरुस्ती होवुन त्यातही पाणी सोडावे. अशी मागणी वजा अपेक्षा स्थानिकांची आहे.