जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २४ ते ४८ तासांत जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, जोरदार वारे, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदी, नाले, पूल, धबधबे तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, बचाव साहित्य व मनुष्यबळ सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पूरप्रवण क्षेत्रे, धरणे, नाले आणि नदीकाठांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वीज, पाणी, आरोग्य, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत आणि नगरपालिका यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळावे. हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास टोल फ्री क्रमांक 1077, जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 0257-2217193 / 0257-2223180 किंवा WhatsApp हेल्पलाईन 9373789064 वर संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.







