जळगाव लाईव्ह न्यूज | कर्जमाफीच्या पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्य शासनाकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली असून राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये जमा झालेत.

शासनाने दिलेल्या माहितीनुसार, आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ (शून्य) झाली असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही आधार प्रमाणीकरण आणि पडताळणी पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पहिल्या टप्प्यात जवळपास 5,029 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून 6.22 लाख शेतकऱ्यांची कर्जखाती आज नील झाली आहेत. ज्या-ज्या शेतकऱ्यांची कर्जखाती पडताळणी पूर्ण होईल, त्याप्रमाणे पुढील रक्कमही जमा केली जाईल.”
पहिल्या यादीतील काही पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या कर्जखात्यांमध्येही कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे. दरम्यान, 12 लाख कर्जखाती त्रुटी दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम, तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वितरित केली जाणार आहे. तसेच, या योजनेत वन टाइम सेटलमेंट (OTS) नसल्याने कोणत्याही शेतकऱ्यावर CIBIL गुणांकनाची अट लागू करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.












