Sunday, December 4, 2022

जमिनीतून निघाली आग अन् गोलाणीची बत्ती गुल!

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील गोलाणी मार्केटमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन जमिनीतून आग निघू लागली अन् सर्वांचीच तारांबळ उडाली. गोलाणीत जमिनीतून टाकलेल्या विद्युत वाहिन्या जळाल्या असून कालपासून गोलाणीची बत्ती गुल झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून वीज पुरवठा खंडित होण्याचा गोलाणीतील व्यापाऱ्यांना त्रास असून महावितरण लक्ष देत नाही.

- Advertisement -

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये बहुतांशी मोबाईलची दुकाने आणि विविध क्लासेस आहेत. राज्य शासनाने गेल्या दोन-तीन आठवड्यापासून भारनियमन बंद केल्याचा दावा केला असला तरी गोलाणीच्या बाबतीत ते साफ खोटे आहे. गोलाणीत गेल्या महिन्याभरापासून दररोज कोणत्या ना कोणत्या भागाची वीज खंडित होत आहे. व्यावसायिक मोठ्याप्रमाणात त्रस्त झाले असून तक्रार करून देखील फायदा झालेला नाही.

गेल्याच आठवड्यात गोलाणीच्या एका विंगमध्ये अचानक वीज पुरवठ्यात वाढ झाल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. बल्ब, ट्यूब, मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर अशा वस्तू जळल्या होत्या. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन गोलाणीच्या तळघरात जमिनीतून आग बाहेर येऊ लागली. जमिनीतून आग येत असल्याने अनेकांची मोठी तारांबळ उडाली. गोलाणीतील वीज पुरवठा देखील खंडित झाला. गोलाणीत जमिनीखालून अंथरण्यात आलेल्या वीज वाहिन्या जळाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी गुल झालेली गोलाणीची बत्ती शनिवारी देखील आलेली नाही. व्यावसायिक आणि क्लासेस मालकांचे मोठे हाल होत असून उकाड्यात काम करावे लागत आहे. शहराच्या देखील काही भागात सकाळपासून बत्ती गुल झाली असल्याचे पहावयास मिळत असून महावितरणने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]