जळगावात प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला भीषण आग; लाखो रुपयांचा कच्चा माल जळून खाक!

जून 19, 2026 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२६ । जळगावच्या सुप्रीम कॉलनी जवळील डुब्बन नगरी परिसरात प्लास्टिकच्या कच्च्या मालाला भीषण आग लागून साठवलेला शेकडो टन माल जळून खाक झाल्याची घटना आज दि १९ जून रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झालं.

fire plastick

डुब्बन नगरी भागातील एका मोकळ्या मैदानात शेकडो टन प्लास्टिकचा कच्चा माल उघड्यावर साठवून ठेवण्यात आला होता. या साठ्याजवळच एक इलेक्ट्रिक डीपी (DP) आहे. या डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याने पेट घेतला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले.

या आगीत प्लास्टिकचे दाणे, प्लास्टिकच्या खुर्च्या आणि चपला तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झाला. आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे साम्राज्य दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या परिसरात प्लास्टिक भंगार आणि कच्च्या मालाची अनेक गोदामे असून, जर आग आणखी पसरली असती तर करोडो रुपयांचे नुकसान झाले असते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now