भुसावळात लाॅकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५० हजारांचा दंड वसूल

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फोट होत असतांना बेफिकीर बाहेर फिरणाऱ्यांची संख्या देखील कमी नाहीये. जिल्ह्यात संचारबंदी आणि लाॅकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठिकठिकाणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. याअंतर्गत भुसावळात काल जवळपास ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री भुसावळात कारवाई केली. संचारबंदीचे उल्लंघन केल्याने ९८ वाहनधारकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

काेराेना संसर्ग वाढत असताना रात्रीच्या वेळी नियम मोडून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गुरुवारी रात्री ८ ते ११ या वेळेत पाेलिस व मुख्याधिकारी रस्त्यावर उतरले हाेते. अत्यावश्यक नसताना दुकाने सुरु ठेवणाऱ्यांनादेखील पथकाने दंड केला. रात्री १० वाजेच्या सुमारास जेवणाचे पार्सल घेण्याचे कारण सांगून जात असलेल्या दोघांना पोलिसांनी प्रत्येकी २०० रुपये दंड केला.

संचारबंदीच्या काळात काेणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आदेश आहेत. त्यामुळे नागरिकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. तरीदेखील नागरिकांकडून याचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे.