जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही काळापासून अवैध वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर हैदोस घातला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरीही अवैध वाळू तस्करांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सूत्रे हाती घेताच जिल्ह्यातील अवैध धंदे आणि वाळूमाफियांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध वाळू वाहतूकविरोधात एक विशेष धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने वाळूमाफियांना जोरदार झटका दिला असून जिल्ह्यात विविध ठिकाणी पाच मोठ्या कारवाया करत गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईने अवैध वाळूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना गिरणा नदीचे पात्र लागून असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन केले जात असल्याची माहिती समोर येत होती. उत्खनन केलेली वाळू जिल्ह्यासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणारी वाहने महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरून भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे.२८ मे रोजी करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी विविध ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली.
या ठिकाणी झाली कारवाई?
जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडी येथे एका डंपरवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतखेडा फाट्याजवळ दीड ब्रास वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडके ते खर्ची रोडवरून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोजे गावाजवळ एका डंपरवर कारवाई करण्यात आली.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानळदा गावाजवळ एक ब्रास वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.







