जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे देश डिजिटल युगाकडे झेपावत असताना, भडगाव तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या धान्य विक्रीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. भडगाव शेतकी संघाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवताना शेतकऱ्यांना तब्बल २४ तासांपासून रांगा लावाव्या लागत आहेत.

मंगळवारपर्यंत शेकडो शेतकरी टोकन मिळवण्यासाठी संघाच्या कार्यालयासमोर जमा झाले होते. भर उन्हात तासन्तास उभे राहूनही प्रशासनाकडून कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. पिण्याच्या पाण्याची व सावलीची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आणि परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“वर्षभर शेतात कष्ट करून पीक पिकवायचं आणि ते विकताना पोलिसांचा मार सहन करावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.दरम्यान, या प्रकारामुळे भडगाव शेतकी संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.











