एटीएमवर मदत घेताय? थांबा… आधी ही बातमी वाचा! भडगावात कार्ड बदलून १.२० लाखांची लूट

एप्रिल 9, 2026 5:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एटीएम केंद्रावर अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय भडगावामधील घटनेतून समोर आला आहे. एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका भामट्याने वृद्धाचे एटीएम कार्ड अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख २० हजार ८१ रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

sbi atm jpg webp

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वडगाव बु॥ येथील रहिवासी असलेले रतन वना पाटील (वय ८७) हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान ते काही कामासाठी भडगाव शहरात आले होते. शहरातील बडेसर कॉम्प्लेक्समधील एका एटीएम केंद्रावर ते पैसे काढण्यासाठी गेले असता, तिथे उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना गाठले. “मी तुम्हाला पैसे काढून देण्यास मदत करतो,” असे म्हणून त्या भामट्याने पाटील यांचा विश्वास संपादन केला.

अशा प्रकारे केली फसवणूक

पैसे काढण्याच्या गडबडीत असताना त्या भामट्याने फिर्यादी पाटील यांचे एटीएम कार्ड शिताफीने बदलले आणि त्यांच्या हातात दुसरेच बनावट कार्ड सोपवले. पाटील यांना या प्रकाराची पुसटशीही कल्पना आली नाही. मात्र, ते तिथून निघाल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख २० हजार ८१ रुपये काढून घेण्यात आले. मोबाइलवर आलेले मेसेज पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.

भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रतन पाटील यांनी तातडीने भडगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now