जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील रस्ते व पूलांच्या विकासकामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पाचोरा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी एकूण १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये हडसन ते दुसखेडा रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, बदरखे दिघी ते दिघी फाटा रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपये, पहाण-मोहाडी-साजगाव रस्ता व मोहाडी गावातील काँक्रीट गटारांसह सुधारणा कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच भातखंडे-अंतुर्ली-ओझर रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपये, नगरदेवळा-चुंचाळे-गाळण-शिंदाड-पिंपळगाव रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपये आणि नगरदेवळा स्टेशन ते नगरदेवळा रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर झाली असल्याचे आमदार किशोर पाटलांनी सांगितले.

भडगाव तालुक्यातील विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी १० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. आर्वी-शिरुड-पळासखेडे रस्त्यावर लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ७५ लाख रुपये, आर्वी-शिरुड-पळासखेडे-भडगाव रस्त्यावर दुसऱ्या लहान पुलासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच भडगाव-वाक रस्त्यावरील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे उर्वरित बांधकाम व वाक बाजूच्या जोडरस्त्यांसाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कजगाव-कनाशी-कोठली-भडगाव रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय नगरदेवळा गावाजवळील आर.ओ.बी. बांधकामासाठी ७५ लाख रुपये भूसंपादनासाठी मंजूर करण्यात आले आहेत. आमदार किशोर पाटील म्हणाले की, “या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळणार असून ग्रामीण भागातील वाहतूक सुरक्षित व सुकर होईल. शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.”
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे हाती घेतली जात असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामे सुरू केली जातील. या विकासकामांमुळे परिसरातील गावांमधील संपर्क सुधारेल आणि आर्थिक व सामाजिक प्रगतीसही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.











