⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ गाड्यांना मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भुसावळ विभागातून धावणाऱ्या दोन गाड्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते रेवा आणि पुणे-जबलपूर या दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांचा कालावधीत वाढवला आहे. यामुळे सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय दूर होईल.

कोरोना काळात संसर्ग वाढू नये म्हणून अनेक गाड्या बंद होत्या.मात्र दोन वर्षानंतर देशात कोरोना कमी झाल्याने अनेक गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यात प्रवाशांची गर्दी देखील वाढली होती. यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते रेवा आणि पुणे-जबलपूर गाडी सुरु करण्यात आली होती. दरम्यान या गाड्यांची मुदत समाप्त झाली. मात्र, सध्याची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ दिली आहे.

०२१३१ पुणे-जबलपूर स्पेशल ही गाडी पुणे येथून १५ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी सुटणार आहे. तर ०२१३२ जबलपूर-पुणे सुपरफास्ट ही स्पेशल गाडी १४ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे पुण्यातून जबलपूरला व जबलपूरहून पुण्यात जाणाऱ्यांची सोय होईल. तसेच ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रेवा ही गाडी २९ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी धावेल. ०२१८७ रेवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल गाडी २८ जुलै ते २९ सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. या गाड्यांच्या धावण्याचे दिवस, वेळ आणि थांबे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.