⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मेंढ्यापाळांमध्ये खळबळ : वन विभागाच्या हद्दीत मेंढ्या चारल्या म्हणून ५० हजारांचा दंड!

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । वन विभागाच्या क्षेत्रात मेंढी चराईसाठी बंदी असताना सर्रास मेंढ्या चराईला सोडल्याने संबंधित मेंढपाळावर वन विभागाने कारवाईचा बडगा उगारता त्याच्याकडून ५० हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, दरम्यान, या कारवाईमुळे वन विभागाच्या हद्दीत अनधिकृत मेंढी चारणाऱ्या मेंढपाळांमध्ये खळबळ उडाली आहे.

वन विभागाचे नियतक्षेत्र पूर्व जुवार्डी कक्ष क्रमांक ३२७मध्ये ही कारवाई करण्यात आली. वन विभागाची जुवार्डी वन जमिन आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने हे संपूर्ण क्षेत्र हिरवेगार झाले आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील आडळसे येथील मेंढपाळ किसन काशीराम मोटे यांनी आपल्या मेंढ्यांना चरण्यासाठी सोडले होते. ही माहिती वन विभागाला समजल्यानंतर पथकाने छापा टाकला. यावेळी मेंढपाळ किसन मोटे यांच्या जवळपास ५० मेंढ्या विना परवानगीने चरताना आढळल्या. एका मेंढीसाठी ५०० रूपये याप्रमाणे त्यांच्यावर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी किसन मोटे यांच्यावर भारतीय वन अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या मार्गदर्शनात जुवार्डीचे वनपाल रामदास चौरे, वन रक्षक राहुल पाटील, काळू पवार, अश्विनी देसाई, वाय. के. देशमुख यांनी केली. दरम्यान, वन विभागाच्या क्षेत्रात गुरे चरताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.