एकनाथराव खडसे बोलतात आणि टार्गेट होतात!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे नव्हे राज्याचे नेते असलेले एकनाथराव खडसे कधी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मुख्यमंत्री पद न मिळाल्याने नाराज झालेल्या खडसेंनी आपली नाराजी वारंवार बोलून दाखवली आणि ते वर्षभराने पक्षातून बाहेर पडले. खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरली खरी पण विधानमंडळात जाण्याची लाईन मात्र लागली नाही. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय वक्तव्यांचा अभ्यास केला असता आपल्या अनुभवाच्या जोरावर खडसे कुणाविषयी काहीतरी वक्तव्य करतात. स्वतःच्या कार्याची माहिती देतात आणि दुसऱ्यांचा रोष ओढवून घेतात. कधी एखाद्यावर टिपणी करतात किंवा कुणाला तरी प्रत्युत्तर देतात आणि स्वतःच इतरांना टीकेची संधी देतात. जिल्ह्यातील नेते खडसेंविषयी विचारलेल्या प्रश्नाला शेलक्या शब्दात उत्तर देतात. एकंदरीत खडसेच त्यात टार्गेट होतात.

जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा मोठा रंजक इतिहास पाहिला तर अलीकडच्या कालखंडात एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांची नावे प्रकर्षाने घेतली जातात. राज्याच्या राजकारणाची सूत्रे केव्हा आणि कशी हलवायची यात या नेत्यांचा मोठा वाटा राहिला आहे. बऱ्याचदा तर जळगावहून सर्व दिशा ठरली जात होती. जिल्ह्यात चारही नेते दिग्गज असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकास तोडकाच झाला हे मात्र वेगळे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत या चार नेत्यांपैकी एकदा सुरेशदादा जैन आणि दुसऱ्यांदा एकनाथराव खडसेंच्या नावाची चर्चा झाली होती. सुरेशदादा जैन गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून लांब असले तरी एकनाथराव खडसे मात्र अजूनही नव्या दमाने सक्रिय आहे.

अनेक वर्ष भाजपात असल्यावर एकनाथराव खडसेंना मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती. पक्ष आपलाच विचार प्रथम करणार अशी आशा असताना नेमका घोळ झाला आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. मुख्यमंत्री पद गेल्याची खंत खडसेंनी बोलून दाखवली. खडसेंनी त्यानंतर वारंवार पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर कळत नकळत टीका केली. टीकेचा ओघ वाढला आणि एका प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सुरु झाला खरा ‘रिव्हेंज मोड’. खडसे खुलेआमपणे टीका करीत होते. बरेच महिने हे चालल्यावर खडसेंनी भाजपला रामराम केला आणि मनगटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले. खडसे भाजप आणि मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना टार्गेट करीत होते. खडसे बोलताना एक होते तर समोरून अख्खी भाजप खडसेंवर तुटून पडायची. काही दिवस हा शाब्दिक युद्धाचा खेळ महाराष्ट्रातील जनतेला इच्छा नसताना देखील पाहावा लागत होता.

विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसेंचे तिकीट कापून त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. अगोदरच वैर असलेल्या खडसे आणि चंद्रकांत पाटलांचे यामुळे अधिकच बिनसले. दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करीत असतात. एकनाथराव खडसे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीत असले तरी ते आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नव्हते. मध्यंतरी तर गुलाबराब पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यातच चांगली शाब्दिक बोलबोली झाली. प्राणघातक हल्ल्यापूर्वी आणि नंतर देखील चंद्रकांत पाटील विरुद्ध एकनाथराव खडसे असे द्वंद्व पाहायला मिळाले. अतिशय खालच्या पातळीचे आरोप आणि टीका एकमेकांवर करण्यात आल्या. फलित काय तर निव्वळ मनोरंजन. काही महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणूकपूर्वी देखील गिरीश महाजन यांनी अशीच टीका केली होती.

शिळ्या कढीला ऊत देत एकनाथराव खडसेंनी पुन्हा आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मुद्दा कोणता तर त्यांनी शिवसेनेचे अस्तित्व दाखवावे. खडसेंच्या वक्तव्याला मिश्किलपणे उत्तर देत चंद्रकांत पाटलांनी त्यांनाच तोंडघशी पाडले. मुख्यमंत्र्यांनी निधी रोखला नसल्याचे सांगत खडसे बोलतात ते मला फुलासारखं वाटते. खडसे सोबत असतील तर निधी मिळायला मदत होईल. असे ते म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना याच मुद्द्याला धरून चंद्रकांत पाटलांची बाजू घेतली आणि खडसेंवरच टीका केली. चंद्रकांत पाटलांनी काढलेल्या खडसे आताच महाविकास आघाडीत आल्याच्या मुद्द्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. इतकच काय तर चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेची साथ दिल्याने ते मित्रपक्षाचे सोबती असल्याचे त्यांनी सांगितले आणि खडसेंनी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याची साखर करतील असे पालकमंत्री म्हणाले.

हे देखील वाचा : जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…

एकनाथराव खडसे जेष्ठ नेते असल्याने त्यांना जिल्ह्यातील आणि राज्यातील नेते त्यांचा मानसन्मान करतात. खडसेंना उलटून बोलण्याचे टाळतात पण कधीतरी कुणी खडसेंना एखादा प्रश्न विचारतो आणि ते बोलून जातात. बोलण्यात काहीतरी वेडेवाकडे निघते मग इतरांना बोलण्याची आपसूकच संधी मिळते. जे कधी खडसेंच्या पावलावर पाऊल ठेवत मोठे झाले, खडसेंनी ज्यांना राजकारणात चालायला शिकवले ते देखील खडसेंवर टीका करतात. जिल्ह्यात खडसेंवर प्रेम करणारे आजही हजारो कार्यकर्ते आहेत पण जेव्हा आरोप, प्रत्यारोपांचा, टीका टिपण्णीचा काळ सुरु होतो तेव्हा मात्र खडसेंकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलतो. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे उर्फ राजूमामा यांच्यावर विरोधक आणि फुटीरवादी हवी तेव्हा नको त्या मुद्द्यावरून टीका करतात परंतु राजूमामा कधीही कुणाला प्रत्युत्तर देत नाही. संयमी भूमिका घेत ते गप्पच बसतात. दुसऱ्यांच्या टीकेला उत्तर देत आपण त्याला का मोठे करायचे? असे त्यांचे मत असते. खडसेंच्या बाबतीत हेच होते. आजवर त्यांनी ज्याच्यावर टीका केली तो मोठा झाला. काही तर मंत्री देखील झाले.

आज दिवस बदलले आहेत. खडसेंकडे कोणतेही मोठे पद नाही, विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लागण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही त्यामुळे मंत्री मंडळ तर लांबच राहिले. राष्ट्रवादीत देखील एखादे मोठे पद नसल्याने खडसेंना केवळ आपलाच बालेकिल्ला मजबूत करण्याचे काम आहे. सध्या असलेल्या निवांत वेळेचा फायदा करून घेत खडसेंनी आपले स्थान अधिक मजबूत करून घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतील. टीका टिपण्णी करून स्वतःच्या महत्त्व वाढविण्याचा, स्वतः चर्चेत राहण्याचा खडसेंनाचा प्रयत्न आपसूकच इतरांना मोठे करून जातोय. तसेच त्याच टीका टिपण्णीत सर्व विरोधक एकत्र येतात आणि खडसेंचाच समाचार घेतात त्यामुळे खडसेंचे महत्व देखील कमी होते. जेष्ठ नेत्याने जेष्ठपणाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेत आपले स्थान मजबूत करणे आणि भविष्याच्या दृष्टीने नियोजन करणे हेच तूर्तास उत्तम आहे.