⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

MLC Election : राष्ट्रवादीला धक्का; खडसेंना जिंकण्यासाठी कमी पडतंय एक मत!

MLC Election News | जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । विधान परिषद निवडणुकीसाठी एक एक मतांची जमवाजमव करत असताना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक (Anil Deshmukh and Nawab Malik) यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. दोन्ही नेत्यांचा विधानपरिषदेसाठी मतांचा अधिकार न्यायालयाने नाकारल्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी होणार आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेचे समीकरण देखील राष्ट्रवादीला नव्याने मांडावे लागणार आहे. याचा सर्वाधिक धोका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनाच मानला जात आहे. (Eknathrao Khadse needs one vote to win)

विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. ११ वा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. मतांची जुळवाजुळव सुरु असतांना राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. सध्या अटकेत असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्य सभेप्रमाणे विधान परिषदेतही मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. आता यातील दोघांना मतदान करण्यास परवानगी नसल्याने एकूण आमदार ५१ उरले आहेत. विधानसभेतील २८८ पैकी २८५ आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठीचा कोटा आता २६ वर आला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी २६ मते हवी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे दोघे जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला आता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज पडणार आहे.

एकनाथराव खडसे यांना भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवून देण्याची शक्यता आधी वर्तविण्यात येत होती. मात्र आता पक्षाची दोन हक्काची मते कमी झाली आहेत. रामराजे निंबाळकर हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. दुसरीकडे खडसेंचा विषय राष्ट्रवादीसाठी आता प्रतिष्ठेचा झाला आहे. यामुळे मतांचे गणित कसे आखण्यात येते यावरच खडसेंचे राजकीय भवितव्य अवलंबून राहील. दरम्यान, भाजपात खडसेंना माननारा एक गट असून तो छुप्या पध्दतीने मदत करेल, असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे.

खडसेंसाठी अजित पवार मैदानात
सध्याचे संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र एकनाथराव खडसे यांचे पारडे अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळे मते फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. यामुळे खडसेंसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. आपल्या दुसर्‍या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेच्या गोटातील आमदारांनाही गळाला लावण्याची शक्यता आहे. याचवेळी शिवसेनेच्या काही आमदारांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा आहे. दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेच्या गोटातील अतिरिक्त मते स्वत:कडे फिरवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा :
MLC Election : खडसेंची क्रॉस वोटिंगवर मदार का राष्ट्रवादी मतांचा कोटा वाढविणार?
MLC Election: विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?
MLC Election : भाजप करणार एकनाथराव खडसेंचा गेम? वाचा कुणी केला गौप्यस्फोट