MLC Election : खडसेंची क्रॉस वोटिंगवर मदार का राष्ट्रवादी मतांचा कोटा वाढविणार?

Vidhan Parishad Election Special : जळगाव लाईव्ह न्यूज : विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यामुळे राज्य सभेप्रमाणे ही निवडणूक देखील चुरशीची ठरणार आहे. कागदावरील आकडेमोडीत सोपी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र अवघड अशीच आहे. या निवडणुकीत राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (NCP Leader Eknathrao Khadse) का काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap Congress)? असे चित्र रंगवले जात आहे. कारण भाजपाकडून या दोन नेत्यांना लक्ष केले जाण्याची शक्यता अधिक आहे. खडसे हे फडणविसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यामुळे खडसेंना विधान परिषेत येण्यापासून कसे रोखता येईल? यासाठी भाजपाने ताकद लावली आहे. मात्र याचवेळी खडसे यांना माननारा एक गट भाजपात देखील असल्याने फडणसवीसांची डोकंदुखी वाढणार आहे. भाजपातील खडसेंना मानणारे, पंकजा मुंडे समर्थक आणि अपक्षांची गोळाबेरीज करुन खडसे निवडून येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Vidhan Parishad Election Cross Voting to Eknathrao Khadse)

विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे ५, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीची मतांची जुळवाजुळव करण्याचा कसोटी लागणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथराव खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Vidhan Parishad : विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?

राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही महाविकास आघाडीला मोठा झटका देण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. हा झटका काँग्रेसच्या भाई जगताप यांना बसणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असली, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथराव खडसे यांनाच भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजप काहीही करून एकनाथराव खडसे यांच्या विरोधात मोठी रणनीती आखणार, हे उघड सत्य आहे.

राष्ट्रवादीचे खडसे हे ज्येष्ठ नेते असून, त्यांना मानणारा भाजपमध्येही मोठा वर्ग आहे. त्यामुळे खडसे यांना भाजपमधूनही क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांची नावे चर्चेत आहेत. हे दोन्ही आमदार खडसेंचे समर्थक मानले जातात. मात्र याचवेळी महाविकास आघाडीतील एक आमदार खडसेंना मतदान करणार नाही, असा दावा देखील केला जात आहे. हे आमदार खडसे विरोधक म्हणून परिचित असून आता ते भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे पंकजा मुंडे समर्थक आमदार खडसेंना क्रॉस वोटींग करण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. यामुळे भाजपानेही आपली रणणीत बदलेली दिसते.

एकनाथराव खडसे यांना भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवून देण्याची शक्यता आहे. मात्र तसे झाल्यास रामराजे निंबाळकर यांचा कोटा कमी होण्याची शक्यता आहे. निंबाळकर हे स्वतः शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असल्याने त्यांना काही दगाफटका झाल्यास ते थेट पवार यांनाच राजकीय आव्हान दिल्यासारखे होऊ शकते. यामुळे निर्माण झालेला तिढा कसा सोडवायचा? यावरच राष्ट्रवादीचे मंथन सुरु आहे. आता राष्ट्रवादी काय निर्णय घेते व भाजपा त्यांची रणणीती कशी खेळते, यावर खडसेंचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

गुप्त मतदान सर्वांसाठी ठरतेय डोकंदूखी
विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. गुप्त मतदानामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात भाजपा व महाविकास आघाडी दोघांनाही याचा सारखाच धोका आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. राज्यसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. हेच गणित आता भाजपाला लागू होते. भाजपाची मोठी डोकंदूखी एकनाथराव खडसेंची आहेत. त्यांना क्रॉस वोटिंग झाल्यास ते सहज निवडून येतील, याची भीती भाजपाला सतावत आहे.

हे देखील वाचा : नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे