⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | MLC Election: विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?

MLC Election: विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असलेल्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Elections) १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असले तरी सर्वाधिक चर्चा होते ती, राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांचीच! याला तिन प्रमुख कारणे म्हणता येतील, पहिले म्हणजे भाजपाला काहीही करुन खडसेंना पाडायचे आहे, दुसरे म्हणजे राष्ट्रवादीला स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी खडसेंना निवडून आणावेच लागेल आणि तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, स्वत:च्या राजकीय पुनर्वसनासाठी खडसेंना काहीही करुन विजयी होणे गरजेचे आहे. या राजकीय आखाड्यात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांची राज्यभर चर्चा होवू लागण्याने संपूर्ण राज्याचे लक्ष जळगावकडे केंद्रीत झाले आहे.

राज्याच्या राजकारणात एकनाथराव खडसे हे मोठे नाव आहे. त्यांनी जेंव्हा भाजपाला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेंव्हा त्यांच्या सोबत अनेक आमदार देखील राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र असे केल्यामुळे आमदारकी धोक्यात येईल म्हणून तनाने भाजपात व मनाने खडसेंसोबत राहण्याचा मार्ग काहींनी निवडल्याचे सांगण्यात येत होते. यात जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या दोन आमदारांचे नाव देखील अनेकवेळा घेतले गेले. आता त्यांची नावे पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे विधान परिषद निवडणूक. या निवडणुकीत सर्वच पक्षांसाठी एकएक मत महत्वाचे आहे. खडसे त्यांना माननार्‍या अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत. यामुळे भाजपातील दोन आमदार खडसेंना मतदान करतील, अशी चर्चा रंगली आहे. हे गुप्त मतदान असल्याने क्रॉस वोटिंग होण्याची भीती सर्वच पक्षांना आहे. मात्र याचवेळी महाविकास आघाडीतील एक आमदार खडसेंची कट्टर विरोधक मानले जातात. ते काही केले तरी खडसेंना मतदान करणार नाही, असे म्हटले जाते. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार राज्यभर चर्चेत आले आहेत.

हे देखील वाचा : MLC Election : खडसेंची क्रॉस वोटिंगवर मदार का राष्ट्रवादी मतांचा कोटा वाढविणार?

विधान परिषदेसाठी असे आहे पक्षिय बलाबल आणि आकडेमोड
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसे संख्याबळ नाही. भाजपचे स्वत:चे संख्याबळ १०६ आहे. त्यांना सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मताधिकार मिळाला नाही तर २८५ विधानसभा सदस्य राहतात. त्या परिस्थितीत पहिल्या पसंतीच्या मतांचा एका जागेसाठीचा कोटा २६ असेल. देशमुख, मलिक यांना मताधिकार मिळाला तर कोटा २७ इतका असेल. २६ च्या कोट्यानुसार पाच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजपला १३० मते लागतील. तर २७ च्या कोट्यानुसार भाजपाला १३५ मते लागतील. राज्यसभेच्या वेळी भाजपाला १२३ मते मिळाली होती. म्हणजे विधान परिषदेला भाजपाला राज्यसभेपेक्षा जास्त अर्थात अतिरिक्त २२ मतांचा जुगाड करावा लागेल.

महाविकास आघाडीत शिवसेना ५५, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४ आणि अपक्षांच्या मदतीने १६९ चे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे. पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त १० मतांची गरज आहे.

खडसेंची जादू अजूनही महाराष्ट्रात चालते का?
महाराष्ट्रातील बड्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथराव खडसे यांचे नाव घेतले जाते. खान्देशात भाजप पक्षाच्या विस्तारात खडसेंचा वाटा कुणीही नाकारू शकत नाही. पण भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळे पुढे खडसे भाजपमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचे पूनर्वसन करण्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचे नाव पाठवण्यात आले होते. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत ते निवडून आले तर कदाचित त्यांना मंत्रीपद देखील मिळू शकते, असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे. मात्र खडसेंना विधान परिषदेत जाण्यापासून रोखण्यासाठी भाजपानेही मोठी ताकद लावली आहे. खडसेंची जादू अजूनही महाराष्ट्रात चालते का? याचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल.

हे देखील वाचा : जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.