आयशरने दुचाकीला उडवले : पत्नी जागीच ठार, पती गंभीर; चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । धरणगाव येथून जवळच असलेल्या पिंप्री गावाजवळील भोद फाट्याजवळ आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी झाल्याची घटना ९ नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात शनिवारी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील पारेख नगरमधील रहिवाशी महादू शिवाजी चव्हाण (वय ४७) हे पत्नीसह ९ नोव्हेंबर रोजी आपली हिरो होंडा स्पेलडर कंपनीची दुचाकी क्र. (एमएच १९ बीई ९५०२) ने जळगाव येथून अमळनेरला जात होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्री गावाच्या पुढे भोद फाट्याजवळ रोडावर आयसर गाडीने त्यांना जोरात ठोस मारली. या अपघातात पत्नी रोशनी हिच्या डोक्यास,पायास, पोटास, गंभीर मार लागला. तर महादू चव्हाण यांच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ मार लागलेला होता. अपघात झाल्यानंतर ठोस मारणारा आयसर गाडी चालक पळून गेला.

यानंतर रस्त्याने जाणा-या लोकांची गर्दी जमा झाली व त्यांच्या मदतीने मालवाहू रिक्षाने जखमी रोशनी चव्हाण यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी महादू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आयसर क्र. (MH १९ CY २५०१) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.