सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीची नोटीस, राजकारणात खळबळ, नेमकं प्रकरण काय आहे?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. ईडीने दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी बोलावले असून 8 जून रोजी त्यांची चौकशी होणार आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु संघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला असून त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणावर समन्स बजावल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे म्हटले आहे. आता चौकशीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही अशा राज्यात भाजपकडून अशा पद्धतीची कारवाई सुरू असल्याने अनेकदा राष्ट्रीय नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही: रणदीप सुरजेवाला
देशाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध भ्याड षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. यावेळी त्यांनी नवे भ्याड कारस्थान रचले आहे. आता पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावली आहे. हुकूमशहा घाबरला हे स्पष्ट आहे. आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही.

2014-15 पासून कारवाई सुरू आहे: अभिषेक मनू सिंघवी
अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ‘या गोष्टींबाबत 2014-15 पासून कारवाई सुरू आहे. आज या गोष्टींबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) समोर आले आहे. अशा प्रकरणात मनी लाँड्रिंगचे आरोप केले जात आहेत, त्यात पैशाच्या व्यवहाराची चर्चा होत नाही. सूडाच्या भावनेने करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये कोणतीही योग्यता नसल्याचा दावा त्यांनी केला.