⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘करपा’मुळे साडेसहा हजार केळी रोपे उपटून फेकली

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१। रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील ज्ञानदेव इंगळे या शेतकऱ्याने सुमारे चार लाख रुपये खर्च करून साडेसहा हजार केळी रोपे लावले होते. मात्र, लावलेल्या केळीवर ‘करपा’ पडल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याने नाइलाजाने उपटून फेकून दिली. इंगळे यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीची फक्त दोन एकर शेती आहे. त्यामुळे इंगळे कुटुंब हताश झाले असून, अशा निकृष्ट दर्जाची टिश्यू कल्चर रोपे विकणाऱ्याविरुद्ध कृषी विभागाने धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सविस्तर असे की, सध्या ढगाळ हवामानामुळे आणि मधून मधून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील केळीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याच्या निर्मूलनासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना औषधी फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खिर्डी खुर्द येथील अल्पभूधारक केळी उत्पादक शेतकरी ज्ञानदेव इंगळे यांच्यावर या वर्षी आभाळच कोसळले आहे. त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीची फक्त दोन एकर शेती आहे. त्यांच्याकडे फक्त दोन बिघे जमीन येते. इंगळे कुटुंब त्यांच्या हेमंत या मुलासह अन्य शेतकऱ्यांची शेतजमीन नफ्याने करून आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवितात.

चार लाख रूपये खर्च

शेतकरी इंगळे यांनी सावदा येथील एका खासगी नर्सरीमधून केळीची ६,५०० टिश्यू कल्चर रोपे प्रत्येकी ८ रुपयाला विकत घेतली. लागवडीनंतर काही दिवसांनी रोपांवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसायला लागला. त्यांनी विक्रेत्याला त्याबाबत सांगितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्या विक्रेत्याचे अपघाती निधन झाल्याचे ज्ञानदेव इंगळे यांचा मुलगा हेमंत याने सांगितले. केळीसाठी त्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये नफा दुसऱ्या शेतकऱ्याला आधीच दिला असून, ५२ हजार रुपयांची रोपे खरेदी केली होती. त्यांच्या स्वतःच्या शेतातून जलवाहिनी आणल्याचा आणि वीजबिलाचा खर्चही मोठा होता. करपा पडल्यानंतर तीन-चार वेळेस औषध फवारणी केली. असे सर्व मिळून सुमारे चार लाख रुपये खर्च झाले. मात्र, हाती काहीही आले नाही. यामुळे इंगळे कुटुंब हताश झाले आहे.

अखेर केळी कापून काढली

ढगाळ हवामान आणि रोपांमधील दोषामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची पाने वाळली. प्रत्येक झाडावर केवळ दोन- तीन पाने हिरवी शिल्लक होती. लागवड करून साडेसहा महिने झाले, तरी केळीला केळ फुल (कंबळ) आले नव्हते. केळीची उंचीही वाढत नव्हती. अखेर ज्ञानदेव इंगळे, त्यांच्या पत्नी, मुलगा हेमंत इंगळे आणि कुटुंबातील सदस्यांनी केळी जड अंतःकरणाने कापून काढली.