⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव मनपाची गेली निवडणूक (सन २०१८) तशी लुटूपुटूची लढाई ठरणार होती. भाजप-शिवसेना युती होणार हे गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांनी एकत्रित सांगितले होते. युती झाली असती तर विरोधातील इतर पाला-पाचोळा होते. तसे ते आजही आहेत. मनपात केवळ ३ पक्षांचे नगरसेवक निवडून येतात. ज्यांचे नगरसेवक निवडून आलेले नाहीत ते पाला-पाचोळा. युती होणार अशा अपेक्षेत जैन निवांत होते. पण भाजपत स्वतंत्र लढण्याचा दबाव वाढल्यानंतर महाजन यांनी युती मोडीत काढून ‘मैत्रिपूर्ण लढत करु या’ असा निरोप एका खुळखुळ्यासह जैन यांना दिला. ही मैत्रिपूर्ण लढत म्हणजे, प्रचार जास्त अंगात आणायचा नाही आणि भरपूर पैसा ओतायचा नाही या तोंडी समन्वयातून करायची सुद्धा ठरले.

पण गिरीश महाजन यांनी निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधून शिवसेनेला तोंडघशी पाडायचे ठरविले. सत्ताप्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट जेव्हा असते तेव्हा त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा पवित्रा घ्यावा लागतो. महाजन यांनी तो पवित्रा घेतला पण जैन हे महाजन यांच्या मैत्रीचा खुळखूळा वाजवत बसले. तसे पाहिले तर जैन यांच्याकडे मनपा निवडणूक जिंकण्यासाठी फारसे प्रचाराचे मुद्दे नव्हतेच. घरकूल घोटाळा, तुरुंगवारी, विधानसभा निवडणुकीत पराभव हे नकारात्मक मुद्दे होते. शहर विकास आघाडीच्या कारकिर्दवर जळगावकर, व्यापारी, उद्योजक नाराज होतेच. हे लक्षात घेऊन जैन यांनीही शहर विकास आघाडी ऐवजी शिवसेनेच्या झेंड्याखाली मनपाची पहिली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. अशातच भाजप सुद्धा स्वतंत्रपणे प्रतिस्पर्धी झाला.

महाजन हे जैनांशी मैत्रीची भाषा बोलत होते पण निवडणूक जिंकायला लागणारे उमेदवारही जैन यांच्या तालिमीत तयार झालेले घेत होते. शिवसेना, नगर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षातून उमेदवारांची आयात महाजन यांनी केली. महाजन किंवा भाजपवरील अती प्रेमातून ही आयात झाली असावी ? या प्रश्नाचे उत्तर कधीही ‘हो’ असे असूच शकत नाही. साम, दाम, दंड, भेद याचा वापर महाजन यांनी केला. ते सहाजिक होते, महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे कोणाला तडीपारीचा, कोणाला चौकशांचा, कोणाला ठेकेदारीचा लॉलीपाप देऊन भाजपचा निवडणूक तंबू उमेदवारांनी भरला. तंबूत एवढी तोबा गर्दी झाली की मूळ भाजपचे असलेल्या उमेदवारांना डावलले गेले. भाजपची ही निवडणूक जिंकण्याकडे होणारी वाटचाल फसवी, दिखाऊ होती. निष्ठा नसलेले लोक सोबत घेतल्याने त्यात प्रतिष्ठा नव्हती आणि टाकाऊ सुद्धा होती.

‘मी जळगावच्या राजकारणात टिकून आहे’, हे जैन यांना दर्शविणे आवश्यक होते. पण गिरीश महाजन यांच्यासाठी जळगाव मनपाची निवडणूक आणि तीत मिळू शकणारा संभाव्य विजय हा फार मोठ्या राजकीय संधीचा भाग होता. पण महाजन यांचे निवडणूक प्रचारापासूनचे नियोजन घिसाडघाई, उथळ, शाब्दीक खेळ व कोट्या करण्याचे राहिले. जळगाव शहरात राजकारणाचे नवे पर्व सुरू करायला जळगावकर उत्सुक आहेत एवढ्या एकाच मानसिकतेचा तात्कालिक लाभ घेणारे नियोजन महाजन यांनी केले. एवढेच नव्हे तर महाजन यांची भाषा सुध्दा उथळ आश्वासने देणारीच होती. ‘एक वर्षात जळगाव बदलून दाखवतो’ हे वाक्य त्याच उथळपणाचे उदाहरण.

जळगावकरांची दिशाभूल करणारा, खंडीभर आश्वासनांचा जाहिरनामा भाजपने जळगावकरांच्या हाती दिला. त्याचे शिर्षक होते, ‘विसंबून कुणावरही नसलेला, सक्षम, दमदार व खऱ्या वचनांचा’ आज तीन वर्षानंतर महाजन ना जळगाव बदलू शकले ना वचननाम्यातील शिर्षकाशी प्रामाणिक वागले. हा जाहिरनामा, उसनवार उमेदवार, पक्षाकडून मिळालेली रसद (म्हणजे काय ? हे विचारणारा ठार मूर्ख) आणि जळगावकरांचीही बदलाची इच्छा या बळावर भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकल्या. १५ जागा शिवसेनेला कशाबशा मिळाल्या. एमआयएम ३ जागा जिंकली. बाकी पाला-पाचोळा कायम होता.

जळगाव मनपा भाजपने जिंकली. पण शहराचा कारभार चालविण्याचे कौशल्य ना महाजन यांच्यात दिसले ना आयात केलेल्या मंडळींमध्ये दिसले. जवळपास अडीच वर्षांचा काळ ठराविक समर्थकांची कुटुंबगिरी, कोंडाळेगिरी आणि पडद्या मागील कमिशनगिरीतच गेला. पहिले महापौरपद जेव्हा आमदाराच्या घरातच दिले गेले त्याच दिवशी मनपातील भाजप फुटीच्या उंबरठ्यावर गेली. भाजपची नंतरची सत्ता लेवा, कोळी, मराठा या सामाजिक गणितावर विभागली गेली. कार्य, कर्तृत्व, दृष्टी या गुणांचा विचारच झाला नाही. वॉटरग्रेसच्या ठेक्यात कोणी कमिशन खाल्ले याची जेव्हा शहरात चर्चा सुरू झाली तेव्हाच गल्लीबोळातील भाजप नगरसेवकांनाही गटार, रस्ते, पथदीप, सफाई, दुभाजक अशा कामांमध्ये कमिनश मिळावे असे वाटू लागले. याच इर्षेतून २५ कोटींची कामे सार्वजिक बांधकामला की मनपाला हा वाद रंगला. कोण कशाला पाठिंबा देतो आणि कोण विरोध करतो हे सोशल मीडियात बोलले जाऊ लागले. कमिशनचा असाच वाद शिवाजी नगर उड्डाण पुलाजवळील हाय टेंशन केबल स्थानांतराचा होता. हे काम महावितरणला की मनपाला या विषयाने नगरसेवकांच्या असंतोषाची वाफ बाहेर काढली.

दरम्यान, भाजपचा पोकळ आश्वासनांचा जाहीरनामा गटांगळ्या खाऊन अमृत योजनांच्या खड्ड्यात गाडला गेला. भाजपने काय काय खोटेनाटे त्यात लिहिले होते हे आज डोळ्यांसमोर येते. प्रधानमंत्री आवास योजना, सूट मालमत्ता करात, कर्मचारी विकास, अग्निशमन दल, शिक्षण, उड्डाणपूल, महिला सक्षमीकरण, युवक व क्रिडा विकास, सुरक्षित जळगाव, वाहतुकीचे नियोजन व पार्किंग व्यवस्था, आरोग्य व स्वच्छता, उद्याने व विकास, फेरीवाला नियोजन, स्मशानभूमी, आपत्ती व्यवस्थापन, समांतर रस्ते, उद्योग विकास, अमृत योजना हे विषय महाजन यांनी स्वतः कधी वाचले का ? महाजन या विषयावर पत्रकार परिषदेत कधी बोलले आहेत का ? याचे उत्तर ‘महाजन ठरले बोलघेवडे.’ ना नियोजन ना अंमलबजावणी. महाजन मंत्री होते पण जळगावचे पालक जाले नाही. हे संकटमोचक हवेतच उड्डाणे करीत राहिले.

जळगाव शहरातील बदलाची अशीच एक संधी भाजपला यापूर्वीही मिळाली होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला होता. भाजपने त्यालाच लाच खाऊ ठरवून बेड्या घालून शहरात पायी फिरवले होते. एका पार्टीत मारले ही होते. सआज तीच अवस्था भाजप नेत्यांची आहे. भाजपचा बहुमताचा डोलारा कोसळतो आहे. संकट मोचक म्हणून महाराष्ट्रभर फिरणारे आज जळगावच्या रस्त्यावर एक एक नगरसेवक शोधत आहेत. हा भ्रमनिरास जळगावकरांचा नाहीच. जळगावकरांनी ३३ वर्षे सुरेशदादांना सत्ता दिली. त्यांनी अनेक विकास प्रकल्प केले सुद्धा. पण भाजपला एक हाती सत्ता देऊनही तीन वर्षात ५७ नगरसेवकांचा अंतर्गात विश्वास मिळवता आला नाही. तेच फुटून पळाले. भाजपने जाहीरनाम्यात छापलेले शेवटचे पान सर्व संबंधितिंचे तोंड काळे करणारे आहे.

जय जय … श्रीराम ….

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार 

हे देखील वाचा :

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

author avatar
दिलीप तिवारी
जेष्ठ पत्रकार आणि आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध