Dharangaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन लक्ष्मणराव पाटील यांनी येथील तहसील व पोलीस स्टेशनला दिले असून मागणी पूर्ण न झाल्यास दि. २० सप्टेंबर मंगळवार पासून साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
धरणगाव तालुक्याचे ठिकाण असून देखील सुविधांचा अभाव आहे, आपातकालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय उपचार लागतो. येथील रुग्णालयात आवश्यक सुविधा २४ तास उपलब्ध असायला पाहिजे. तज्ञ डॉक्टरांची टीम व सुसज्ज रुग्णवाहिका, तसेच ऑक्सिजनची सुविधा व इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मी दिलेल्या अर्जाचा सहानभूतिपूर्वक विचार करून येत्या पाच दिवसात शाश्वत खुलासा करावा अन्यथा दि. २० सप्टेंबर २०२२ मंगळवार पासून मी साखळी उपोषणाला सुरुवात करेल. संविधानिक मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून छत्रपती शिवराय स्मारकाजवळ साखळी उपोषणाला बसणार आहे. अशी पूर्व परवानगी चे निवेदन धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे व पोलिस स्टेशनचे पिएसआय संतोष पवार यांना सदर निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, एच.डी.माळी, पी.डी.पाटील, बापू मोरे, विक्रम पाटील, अमोल सोनार, निलेश पवार, आनंद पाटील, भूषण भागवत, निलेश माळी, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, राकेश पाटील आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.