⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धानोरा येथील एटीएम फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ |  येथील जळगाव रोडवरील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेस मधील  इंडिकॅश कंपनीचे  एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न गुरुवारी (ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कडक लॉकडाऊन सुरू असून रात्री रस्ते निर्मनुष्य असतात. याचा फायदा उचलत काही अज्ञात दरोडेखोरांनी धानोरा येथील जळगाव रस्त्यावर असलेले इंडिकॅश (INDICASH) कंपनीचे  एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोडण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. लोखंडी साहित्य वापरून त्यांनी  एटीएम मशीनचे नुकसान केले आहे. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी गस्त वाढवावी

चोपडा तालुक्यातील धानोरा हे गाव मोठ्या बाजारपेठेचे असून या ठिकाणी यावल रस्त्यावर सेंट्रल बँक व जळगाव रस्त्यावर इंडीकॅश कंपनी चे एटीएम आहेत. मागे अनेक वेळेस या दोन्ही ठिकाणी धाडसी चोरी झालेली आहे. त्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरांचा बंदोबस्त करण्याची  मागणी परिसरातून केली जात आहे.

दोन्ही एटीएमवर सुरक्षारक्षक नाही

बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्ग वरिल धानोरा या गावात एटीएम फोडण्याचे प्रकार नेहमी सुरूच असतात. अनेकदा एटीएम फोडून लाखो रुपये चोरून नेण्यास दरोडेखोरांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वारंवार या सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम वर वेधले जाते. त्यामुळे या दोन्ही एटीएमवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.