⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

अमळनेरातील यात्रोत्सवासह भाविकांनी लुटला टेकडीवरील हिरवळ व पावसाचा आनंद!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । प्रती पंढरपुर म्हणून ओळखली जाणाऱ्या अमळनेरातील श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडीवरील यात्रोत्सव, सोमवारी उत्साहात पार पडला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या काळानंतर भरलेल्या यात्रेत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अंबरीष ऋषी मंदिरात दर्शनासोबत भाविकांनी टेकडीवरील हिरवळ व पावसाचा आनंद लुटला.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सायं. ४ ते रात्री ९ या काळात भरणारी ही यात्रा अमळनेर शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. शहरातून अनेक कुटुंबियांनी सोमवारी यात्रेला हजेरी लावली. यात्रेच्या काळात पाऊस असो की नसो गर्दीचा उत्साह वाढतच जातो. यात्रेतील गरमागरम भजी, वडापाव, पात्रा भजी, चिवडा, गुळाची जिलेबी हे खाद्यपदार्थ यात्रेचे आकर्षण आहेत. सोबतच टेकडीवरील गार हवेच्या झोकात हात उंचावून फुग्याची काकडी धरून ती वाजवणे हे येथील यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. तसेच लहान मोठे पाळणे आणि खेळण्यांची दुकाने लावली गेली होती. यामुळे बच्चे कंपनी दरवर्षी या यात्रोत्सवाची वाट पाहते.

टेकडीवर यात्रेला किंवा यात्रे नंतर कधीही आल्यावर नाश्ता व जेवण केल्यावर उरलेले अन्न व कागद, इतर वस्तू रद्दी पेपर इतरत्र न टाकता, सोबत आणलेल्या पिशवीत भरून श्री. अंबरीषजी ऋषी महाराज टेकडी ग्रुपच्या सदस्यांकडे द्यावे. किंवा मंदिराजवळच मोठा ओटा आहे त्याच्या मागिल बाजूस नेऊन टाकावी अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच वृक्षांचे नुकसान टाळण्यासाठी आपली वाहने टेकडीच्या खालीच लावावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

आयकर आयुक्त संदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने श्री अंबरीष महाराज टेकडी ग्रुपने परिसरात वृक्षारोपण करणे, जलसंवर्धनाचे उपक्रम राबवले आहेत. आजवर टेकडी परिसरात सुमारे ३५ हजार रोपे लावली आहे. या रोपांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे यासाठी पर्यावरणप्रेमी परिश्रम घेत आहेत.
टेकडीवरील श्री. अंबरीष ऋषी महाराजांची मूर्ती.