⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Cyber Crime : सेवानिवृत्त वृद्धाला ६२ हजारांचा लावला चुना, युपी, दिल्लीच्या आरोपींकडून हस्तगत केले २० लाख रोख तर १८ लाख गोठवले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. २०१७ ते २०२१ दरम्यान जळगाव शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धाला इन्शुरन्स कंपनीच्या नावाने ६२ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने तपास करून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून ७ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वीस लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली आहे तर एकाच्या खात्यातील १८ लाख रुपये गोठविण्यात आले आहे. फसवणूक झालेले वृद्ध आज हयात नसले तरी रक्कम जळगाव पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

नोव्हेंबर २०१७ ते दि. २५ ऑक्टोबर २०२१ चे दरम्यान वेळोवेळी फिर्यादी टिकाराम शंकर मोळे, वय-८८. व्यवसाय सेवा निवृत्त, रा.गट नं.६२, प्लॉट नं.६, विदयुत कॉलनी, जळगांव यांच्याशी दिपका शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकरन रेही असे नाव सांगणा-या अनोळखी इसमांनी इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत स्वतःची ओळख लपवून वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क केला होता. आरोपींनी Star Health and Allied Insurance Company Limited कंपनीतून बोलत असल्याचे सांगुन भोळे यांना Star Health Insurance कंपनीचे बनावट कागदपत्रे हे फिर्यादी यांचे जळगाव येथील राहते पत्यावर पाठविले होते. आरोपींनी भोळे यांना स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगुन तसेच पॉलीसी मध्ये गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी पॅनकार्ड लिमीट वाढविणे, रकमेवरील बँक कमीशन, गव्हर्नमेंटकडुन एनओसी मिळण्यासाठी असे वेगवेगळे कारणे सांगुन वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपये हे वेगवेगळया बँक खात्यामध्ये ऑनलाईन स्विकारुन फसवणुक केली होती.

जळगाव सायबर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासादरम्यान फिर्यादी यांना आलेले ई-मेल, मोबाईल क्रमांक, बैंक खाते, CCTV फुटेज, तसेच इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषन करून सदर गुन्ह्याचे तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने, सोबत हवालदार राजेश चौधरी, प्रविण वाघ, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, गौरव पाटील, दिपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, पंकज वराडे, उज्ज्वला माळी यांचे पथक दिल्ली व उत्तरप्रदेश येथे रवाना केले होते.

पथक गाझीयाबाद, नोयडा, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील थांबून होते. पथकाने अमित देवेंद्र प्रकाश सिंग, रा. १/१९११, मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नार्थ ईस्ट दिल्ली, लखमीचंद राजेश कुमार, रा. बी २/५० गल्ली नंबर १२, जोहरी पुर, दिल्ली, दिपेश कुमार तारकेश्वर सिंग, रा. प्लॉट न.सी-१/१२ ३ मजला इन्क्लेव्ह, नवी दिल्ली. अमीत वर्मा रामसिंग वर्मा उर्फ विक्रम सुरेश,रा. A८७, सेक्टर ०२, नोयडा, उत्तर प्रदेश, राजकुमार कल्याण सिंग ऊर्फे अनुराग शर्मा, रा. राधा कॉलनी लालकुआ, गाजियाबाद उत्तर प्रदेश, रविकुमार यशपाल सिंग ऊर्फे कमलाकर रेड्डी, रा. जलालपुर गौतमबुध्द नगर, उत्तर प्रदेश, सोनी यादव पिता कृष्णेंद्रकुमार यादव, रा.दिल्ली, यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्हयातील फसवणुकीतील रक्कम एकुण २० लाख ३० हजार हस्तगत करण्यात आले आहे. तसेच फरार आरोपी अक्षय यादव पिता कृष्णेंद्रकुमार यादव, रा.दिल्ली यांच्या वेगवेगळया बँक खात्यातून १८ लाख ६२ हजार रुपये गोठविण्यात आली आहे. तसेच फरार आरोपी रिटा सहाणी रा. दिल्ली यांचा शोध सुरू असून गुन्हयाचा तपास देखील सुरु आहे.