Cotton News : कापसाला मिळत नसलेल्या भावामुळे मंदावले ग्रामीण भागातील अर्थचक्र

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । गेल्या तीन महिन्यापासून भाववाढीचा प्रतीक्षेत घरात साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण कापूस घरात ठेवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाहीये. म्हणजेच उत्पन्न या क्षणाला शून्य आहे.

दुसऱ्याकडे घेतलेले व्याज व कापसापासून सुटत असलेल्या अंगाखाजीमुळे दवाखान्याचा खर्च देखील वाढला आहे. अशा संकटात ग्रामीण भागातील शेतकरी सापडला आहे.

शेतकऱ्याचा ४० टक्के कापूस घरात पडून आहे. बाजारात हमीभावाच्या तुलनेत ज्यादा भाव मिळेल अशी त्याची आशा आहे. गेल्या वर्षी तेरा हजारापर्यंत कापसाचा भाव पोहोचला होता. मात्र यंदा 8000 ही शेतकऱ्याला मिळत नाही. किमान दहा हजार भाव मिळेल अशा अपेक्षित शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे.

शेतकऱ्याला दहा हजार रुपयांच्या भावाची अपेक्षा लागली आहे. कापसाचे भाव वाढले तर नाहीत मात्र आता ते आठ हजारावर स्थिरावले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज, त्याच्या व्याजाचा डोंगर झाला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून मोजून ठेवलेल्या कापसाचा वजनात दहा क्विंटल मागे एक ते दीड क्विंटल वजन कमी झाले आहे. पुन्हा रखबीसाठी व्याजाने घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढला आहे.कापूस पिकला पण विकता येत नसल्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात अडकला आहे. याच बरोबर घरात ठेवलेला कापूस एवढ्या कमी भावात विकायचा कसा? अशा प्रश्न शेतकरी राज्याला पडला आहे.