जळगाव लाईव्ह न्यूज | १८ सप्टेंबर २०२३ | यंदा पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचेच टेन्शन वाढविले होते. जुलै महिन्यातील हजेरीनंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस बेपत्ता झाला होता. ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाने ऑगस्टमध्ये मोठी दडी मारली होती. ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिटचा अनुभव येत होता; तर पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होत आहे. गत काही दिवसांपासून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात संततधार सुरू असल्याने नद्या-नाले वाहू लागले आहेत.
खरीप हंगामात गत आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. गिरणा, वाघूर, हतनूर जलाशयात साठा वाढला आहे. यामुळे सिंचनाला मोठा फायदा होईल. चांगला पाउस सुरू असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. खरिपातील कापसाला याचा मोठा फायदा होऊन अपेक्षित उत्पादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. जमिनीची भूक भागल्याने पाणीसाठाही होत आहे. पिकांवरील रोगराई परतीच्या पावसाने धुवून निघाली. याचा फायदा खरिपाच्या पिकांना व आगामी हंगामातील रब्बी पिकांना होणार आहे.
ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची बिकट स्थिती होऊन, उत्पादनात ५० टक्के घटीची शक्यता होती. आताच्या पावसाने उत्पादनातील तूट काही अंशी भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या होत असलेल्या समाधानकारक पावसाने जिरायतीला बोंडे येतील, पितृपक्षात ती फुटतील. विजयादशमीपर्यंत खरिपातील जिरायती कापूस बाजारात येईल, असा अंदाज आहे. यंदा कापसाला प्रतिक्विंटल सात ते आठ हजारांचा दर असेल, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. दसऱ्यापर्यंत हंगामातील कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे.
गत महिन्यापर्यंत पावसाअभावी कापसाच्या उत्पादनाविषयी शंका होती. मात्र, गत आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने आशादायक चित्र आहे. परतीच्या पावसाने कापूस उत्पादन चांगले येणार आहे. बाजारात थोडा उशिराने कापूस येईल. यंदा कपाशीवर बोंड अळी नाही. यामुळे कापसाचा दर्जा चांगला राहील, असाही जाणकारांचा अंदाज आहे. गत हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळलानाही मात्र यावेळी गत हंगामाचे झालेले नुकसान देखील भरुन निघेल, असा अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे.