जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप ती पूर्ण झाली नाहीय. यातच अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारकडून मोठ्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. मात्र यातच जळगावच्या चोपड्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो, असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय. या विधानानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.

चोपडा तालुक्यात घोडगाव येथे पीपल्स बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बाबासाहेब पाटील यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते.” असंही म्हटल. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असून आम्ही निवडून यायचे आहे त्यामुळे निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, हे प्रकरण जास्तच पांगल्याचे लक्षात येताच मग बाबासाहेब पाटील यांनी कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.
तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले. पण जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती असं कोण्या तरी शहाण्यानं म्हटलंच आहे, तसा शहाणजोगपणा मतदारांमध्ये कधी येईल याची खमंग चर्चा यानिमित्तानं सोशल मीडियावर मात्र सुरू आहे.












