३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आर. के. पाटलांचा गौरव; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सपत्नीक सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) तब्बल ३७ वर्षे प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या आर. के. पाटील यांच्या सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम २६ जून २०२६ रोजी संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. “एसटी ही महाराष्ट्राची केवळ जीवनवाहिनी नसून रक्तवाहिनी आहे. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. राज्याच्या प्रगतीत एसटी कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून आर. के. पाटील यांनी ३७ वर्षे निष्ठेने सेवा बजावत कामगारांसाठीही मोलाचे कार्य केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आर. के. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आर. के. पाटील व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, चोपडाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जळगावच्या महापौर दीपमाला काळे, पाचोर्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, माजी उपमहाव्यवस्थापक सोपानराव नाबदे, माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरण बिडवे, संघटक सचिव सुभाष जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख, सुरेश चांगरे, गोपाल पाटील, विनोद शितोळे, प्रशांत मोरे, सागर निकुंभ, खुशाल मोरे, शैलेश नन्नवरे तसेच एसटी महामंडळ जळगाव विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी आजी-माजी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आर. के. पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. बी. महाजन यांनी केले.







