⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

आयुक्त मॅडम तुम्ही अतिक्रमणावर कारवाई करण्याची धम्मक दाखवणार का?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । शहरातील फुले संकुलात व इतर सर्व संकुलांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांची मुजोरी वाढली आहे. हे दुकानदार शहरातील अधिकृत दुकानदारांना वेठीस ठेवत त्यांच्या दुकानापुढे व्यवसाय करत आहेत. तर दुसरीकडे आपल्या नागरिकांच्या शांततेचा अंत बघत आहेत. कारण सर्रासपणे विक्री करताना या हे अनधिकृत व्यावसायिक नागरिकांची देखील अरेरावीची भाषा करत आहेत. एकीकडे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यावर आयुक्त विद्या गायकवाड यांनी जळगाव शहरातील विविध ठिकाणी कारवाई करत जळगाव शहरामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र हा दबदबा अतिक्रमण करणाऱ्या मुजोर व्यावसायिकांपुढे कमी पडत असून त्यांची मुजोरी सुरूच आहे.

फुले मार्केट म्हणा किंवा इतर व्यापारी संकुल म्हणा या संकुलांमध्ये भाडेतत्त्वावर महानगरपालिकेने अधिकृतपणे गाळ्यांचा लिलाव करत गाळेधारकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे दिले आहेत. मात्र या संकुलांमध्ये मुजोरी अतिक्रमण करणारे काही व्यावसायिक बिनधास्तपणे वाट्टेल तो व्यवसाय करत आहेत . फुले मार्केट सारख्या ठिकाणी तर नागरिकांना सायंकाळी पाय ठेवणेही कठीण झाले आहे. पार्किंग असो किंवा इतर काहीही जिथे दिसेल तिथे हे लोक बसत आहेत व आपला व्यवसाय चालवत आहेत. अशावेळी अश्या मुजोर अनधिकृत अतिरक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्यासाठी काहीना काही करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा आज पुरुषांवर अरेरावी करणारे हे व्यवसायिक उद्या स्त्रियांना ही अरेरावी करताना पुढे मागे बघणार नाहीत.

हे देखील वाचा – मनपाच्या अतिक्रमण विभागाचे ‘अर्थ’कारण, मुजोरांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव

जळगाव शहरातील व्यापारी संकुलं ही जळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे रोज हजारोंच्या संख्येने नागरिक काही ना काही व्यवहार करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. अशा वेळेस नागरिक आपल्या गाड्या पार्क करतात त्या पार्किंग मध्येच मात्र हे पार्किंग देखील या अतिक्रमण करणाऱ्या मुजोर व्यवसायिकांनी गिळंकृत केले आहे.हि आमची जागा आहे. तुम्ही इकडे गाडी लावू शकत नाही अशी त्यांची भाषा असते. मात्र यांच्यावर कोणतीही कारवाई महापालिका प्रशासन करत नसल्याने या मुजोर अनधिकृत अतिरक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचे फावत आहे. तर दुसरीकडे याठिकाणी कोणतीही कारवाई ना केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रोज चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नागरिकांनी आता त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षिक आहे अन्यथा वेळ निघून गेलेली असेल.