⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मनपाच्या अतिक्रमण विभागाचे ‘अर्थ’कारण, मुजोरांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । शहरातील फुले संकुलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पार्किंग आणि शौचालयासाठी असलेली जागाही काही हॉकर्सकडून बळकावण्यात आली आहे. मात्र यामुळे अर्थकारण दडले असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी चर्चा शहरात सुरु आहे.

सिगारेट, गुटखा, पानमसाला विक्रेते, भुर्जीपावच्या गाड्या, मोबाइलचे साहित्य-पुस्तक विक्रेते, सॉक्स, मोजे, रुमाल आणि खेळण्यांपासून ते चणे शेंगदाण्यांपर्यतच्या वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांचा वेढा फुले मार्केटच्या पार्किंगला पडला असून यामुळे नागरिकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये एकच दहशत पसरली आहे.

फुले मार्केट हे जळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे रोज हजारोंच्या संख्येने नागरिक व्यवहारासाठी या ठिकाणी येत असतात. अशा वेळेस नागरिक आपल्या गाड्या पार्क करायला येतात तेव्हा हे मुजोर फेरीवाले ही जागा आमचीच आहे अशा आवेशात नागरिकांशी बोलतात. नागरिकांनी जर यांच्या विरोधात आवाज उचलायचा प्रयत्न केला तर नागरिकांना सर्व फेरीवाले एकत्र येऊन अरेरावीची उत्तरे देतात. यामुळे या फेरीवाल्यांशी कोणी वादही घालत नाहीत.

जळगाव शहरातील बहुसंख्य महिला या फुले मार्केटमध्ये खरेदी करायला येत असतात. यावेळी महिलांबाबत काही फेरीवाले अपशब्द उच्चारत असतात. यामुळे महिला देखील या ठिकाणी सुरक्षित नसल्याचे समोर येत आहेत. नुकतीच फुले मार्केट परिसरात हॉकर्समध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले होते. यावेळी या फेरीवाल्यांनी लोखंडाच्या सहाय्याने हल्ला करायचा प्रयत्न केला होता असेही म्हटले जात आहे. अशा प्रकारच्या घटना जर फुले मार्केटमध्ये घडत राहिल्या तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहुळे उपयुक्त असे पर्यंत या भागात पोलिस आणि महापालिका सक्रिय झाली होती. परंतु आता पोलिस आणि महापालिकेची यंत्रणाही या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचे हि समोर आले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पोलिसांच्या आणि महापालिकेच्या कारवाईची दहशत राहिली नसल्याने फेरीवाल्यांनी पार्किंग ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे.