जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी भुसावळ दौरा केला. यात मनमाड ते भुसावळ सेक्शनची पाहणी त्यांनी केली. यावेळी मध्य रेल्वेतील पाचही विभागांसाठी भुसावळात मेमू कारशेड उभारले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) अनिलकुमार लाहोटी यांनी पत्रपरिषदेत दिली.

तसेच भुसावळ येथून अप-डाऊन करणार्यांच्या मासिक पासबाबत लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल. आता प्रवासी हे तिकीट घेऊन प्रवास करीत आहे. रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच पास दिला जाईल. प्रवाशांना मिळणार्या इतर सुविधाही पुरवल्या जातील असेही ते म्हणाले आहे. या वेळी डीआरएम एस. एस. केडिया, एडीआरएम नवीन पाटील, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

भुसावळ येथील 150 एकर जागेवरील अतिक्रमण काढले असून त्या जागेवर कोच फॅक्टरी उभारली जाणार होती. मात्र, त्याऐवजी आता मेमू रेल्वे गाड्यांचे वर्कशॉप (मेमू कार शेड) सुरू केले जाणार आहे. 150 कोटी रुपये खर्चाचे मेमू शेड 100 एकर जागेवर उभारले जाईल. मध्य रेल्वेतील भुसावळसह नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर या विभागांतील हे पहिलेच मेमू वर्कशॉप आहे. या सर्व विभागांतील मेमू गाड्या येथे देखभाल, दुरुस्तीसाठी येणार आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हातालाही काम मिळेल, असेही लाहोटी यांनी सांगितले.
आता पाचोरा-जामनेर ब्रॉडगेजबाबत मार्चपर्यंत निर्णय
पाचोरा-जामनेर नॅरोगेज गाडीचे दोन्ही इंजिन आणि डबे हे कालबाह्य झाले आहे. कोरोनाच्या काळातच ही गाडी बंद केली. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळाली असून तिन्ही विभागांकडून सर्व्हे होत आहे. तो रेल्वे बोर्डाला पाठवून मार्चपर्यंत त्यावर निर्णय होईल, असे लाहोटी म्हणाले.
लवकरच धावणार ताशी 130 वेगात रेल्वेगाडी
भुसावळ विभागातील शुक्रवारच्या दौर्यात जीएम लाहोटी यांनी विशेष जीएम स्पेशल गाडी ही ताशी 130 किमीच्या वेगात चालवण्यात आली. विभागातील रूळ व जमीन चांगली आहे. त्यामुळे लवकरच भुसावळ विभागात ताशी 130च्या वेगात मेल, एक्स्प्रेस या गाड्या धावू लागतील, त्यामुळे गाड्यांचा वेळ वाचेल.
हे देखील वाचा :
- नशिराबाद पोलिसांची वेश्याव्यवसायावर कारवाई; दोघांना अटक, दोन महिलांची सुटका
- स्व. अजितदादा पवारांच्या प्रथम जयंतीनिमित्त यावल तहसील कार्यालयात प्रतिमा भेट
- पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- मुख्यमंत्री फडणवीसांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’












