जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाने मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकापर्यंत धिंगाणा घातल्याची घटना ३० डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली. त्याने कारने लावलेले बॅरिगेट उडवत तीन दुचाकी व एका चारचाकीला धडक दिली. प्रेमराज सुभाषराव वाघ (३६, रा. दहिवद, ता. चाळीसगाव) असे या लिपिकाचे नाव असून मद्यपी लिपिक कारचालकाला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले.
दरम्यान, ‘थर्टी फर्स्ट’ पूर्वीच धुमाकूळ घालणाऱ्या कारचालकाला पब्लिक मार बसणार होता, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेला प्रेमराज वाघ शनिवारी रात्री कारमधून (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होता.
यावेळी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्यावतीने आकाशवाणीनजीक बॅरिगेट लागून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी लावलेल्या बॅरिगेट्स जवळ हा कारचालक न थांबता बॅरिगेट्सला उडवून सुसाट निघाला. त्यात पुढे असलेल्या तीन दुचाकी व एका चारचाकी वाहनाला त्याने धडक दिली.
यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे हे जखमी झाले. या ठिकाणी हजर असलेले पोलिसांनी या कारचालकाचा पाठलाग करून त्याला सर्कल जवळच पकडले. या ठिकाणी संतप्त नागरिक त्याला चोप देणार होते, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेले. कारचालकाने बॅरिगेट्सला उडविल्यानंतर एकामागे एक अशा तीन दुचाकी व एका कारला धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने या चौकात गर्दी कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.