जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर युद्ध तात्पुरते थांबवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रवासासंदर्भात विशेष अॅडवायजरीही जारी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने इराणमधील भारतीयांना स्थानिक भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू नये आणि फक्त अधिकृत व शिफारस केलेल्या मार्गांचा वापर करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिक +989128109115, +989128109109, +989128109102, आणि +989932179359 या नंबरवर कॉल करु शकतात. याचसोबत [email protected] या ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. पुढील ४८ तास सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ एप्रिल रोजी दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर केल्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत. या कालावधीत परिस्थिती स्थिर राहिल्यास भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.












