जळगाव जिल्ह्यात आजपासून 28 जुलैदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू ; यावर राहणार बंदी?

जुलै 14, 2026 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी दि. 14 जुलै 2026 रोजी रात्री 00.01 वाजेपासून ते दि. 28 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Jalgaon Restraining order

आगामी पंधरवड्यात विविध सण, उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम व ग्रामीण भागातून छोट्या स्वरूपाच्या पालख्या काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, काठ्या अथवा शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे किंवा वस्तू घेऊन फिरण्यास बंदी आहे. दाहक किंवा स्फोटक पदार्थ व द्रव्ये बरोबर बाळगणे, दगड अथवा फेकण्याची हत्यारे व साधने तयार करणे, जमा करणे किंवा बरोबर नेण्यासही मनाई करण्यात आली आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरीत्या ओरडणे किंवा विक्षिप्त हावभाव करणे तसेच सभ्यता किंवा नीतिमत्तेविरुद्ध अथवा शांतता धोक्यात आणणारी भाषणे, हावभाव, सोंग, चिन्हे, चित्रे व फलक लावण्यास बंदी राहणार आहे.

मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 37 (3) अन्वये पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास तसेच पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

लाठी किंवा तत्सम वस्तूच्या आधाराशिवाय चालता येत नसलेल्या वृद्ध अथवा दिव्यांग व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही. तसेच शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा, लग्न मिरवणुका व धार्मिक मिरवणुकांना आदेशातून वगळण्यात आले आहे. शासनाच्या सेवेतील तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही.

हे आदेश दि. 14 जुलै 2026 रोजी रात्री 00.01 वाजेपासून ते दि. 28 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now