जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव शिवारात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू आणि पतीने मिळून स्वतःच्या साडेतीन वर्षीय अंध मुलाला विहिरीत ढकलून ठार मारल्याचा आणि ७० टक्के दृष्टिहीन असलेल्या पत्नीच्या हत्येचाही प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणाला खुनाचे गंभीर वळण मिळाले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) आणि त्यांचा साडेतीन वर्षीय मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. यात सरस्वती या जखमी झाल्या, तर चिमुकल्या कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

जखमी सरस्वती यांच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांनी कोणताही जबाब दिला नव्हता. मात्र, मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला.
तक्रारीनुसार, शेतातील विहिरीच्या पूजेसाठी गेले असताना सासू आशाबाई भागवत पाटील (वय ६०) यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिले. या कटात जखमी सरस्वती यांच्या पती स्वप्निल भागवत पाटील (वय ३४) याचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विहिरीतील लाकडीचा आधार मिळाल्याने सरस्वती यांचा जीव वाचला, मात्र कृष्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तपासादरम्यान या गुन्ह्यामागील कारणही समोर आले आहे. फिर्यादी आणि आरोपी पती हे दोघेही दृष्टिहीन असून, जन्माला येणारे अपत्यही अंध असण्याची शक्यता डॉक्टरांनी सोनोग्राफीदरम्यान व्यक्त केली होती. त्यावेळी आरोपी पतीने गर्भपात करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, फिर्यादीने मुलाला जन्म दिल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. या कारणामुळे फिर्यादी सुमारे अडीच वर्षे माहेरी राहत होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.












