⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गिरीश महाजनांसह २८ जणांविरोधात गुन्ह्याची चौकशी आता सीबीआय करणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. मात्र शिंदे सरकरकडून गेल्या सरकारकडून घेण्यात आलेले अनेक निर्णय रद्द केले जात आहे. त्यात आता नव्या सरकारनं महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हातून काढून सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची तयारी आहे. त्यानुसार भाजप नेते आमदार गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यासह इतर 28 जणांविरोधात गुन्ह्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे.

शिंदे सरकरकडून राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने तसे निर्देश पोलिसांना दिले आहे. गिरीष महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा तसंच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल (Phone Tapping Case) लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे.

आ. गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा दाखल गुन्हा आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 29 आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआय करणार आहे.

दरम्यान, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अधिवेशनात गाजलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब गिरीश महाजन यांच्यावर दाखल गुन्ह्यातील दाहक वास्तव उघड करणारा होते. या खळबळजनक प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी येत्या दिवसात होणार असल्याचं बोललं जात आहे. तत्कालीन सरकारी वकील प्रविण चव्हाण, काही पोलीस अधिकारी तर काही बडे राजकीय नेते आता CBI च्या रडारवर आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा खरा की खोटा ? याचाही तपास होणार आहे. तपासात हा गुन्हा खोटा असल्याचं निष्पन्न झालं तर फिर्यादीही अडचणीत येणार आहे.