ईद-ए-मिलादपूर्वी अमळनेरात पोलिसांचा ‘रूट मार्च’

ऑगस्ट 24, 2026 5:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. सण शांततेत पार पडावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी पोलिसांकडून शहरातील विविध भागांतून रूट मार्च काढण्यात आला. सकाळी १० ते ११.२० या वेळेत झालेल्या या संचलनामुळे संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.

rutmarch amalner

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला. सणाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास मिळावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश होता.

प्रमुख मार्गांवर पोलिसांचे संचलन

अमळनेर शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणांवरून पोलिसांचे संचलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डीपी, आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक मार्गे गांधलीपुरा चौकीपर्यंत रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह झालेल्या या संचलनामुळे शहरात सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.

११ अधिकारी, १२५ अंमलदारांचा सहभाग

या रूट मार्चमध्ये विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. अमळनेर पोलीस ठाण्याचे ६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवडचे २ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोलचे १ अधिकारी व १० अंमलदार आणि धरणगावचे १ अधिकारी व ३ अंमलदार सहभागी झाले. यासोबतच चोपडा ग्रामीण व चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रत्येकी ३ अंमलदार, पोलीस मुख्यालयाच्या दंगा नियंत्रण पथकातील ३ कर्मचारी आणि एक क्यूआरटी पथकही सहभागी झाले. अशाप्रकारे एकूण ११ अधिकारी आणि १२५ अंमलदार या रूट मार्चमध्ये तैनात होते.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

रूट मार्चदरम्यान जळगाव पोलीस मुख्यालयाच्या बँड पथकानेही सहभाग घेतला. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी ईद-ए-मिलादचा सण शांततेत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करावा. तसेच सोशल मीडियावरील अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारावर पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now