जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२६ । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोदरी येथील प्रसिद्ध ढालकी धबधबा येथे आज मंगळवारी एक दुर्दैवी घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाचा धबधब्यावरून खाली पडून मृत्यू झाला. आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आकाश पडघान हा महाविद्यालयाच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी तो आपल्या पाच ते सहा मित्रांसह गोदरी येथील प्रसिद्ध ढालकी धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास धबधब्याजवळ पोहण्याचा आणि पावसाळी निसर्गाचा आनंद घेत असताना त्याचा अचानक पाय घसरला आणि तो उंचावरून खोल दरीत कोसळला.

या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. घटनेनंतर मित्रांनी व वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदती तातडीने त्याला उपचारासाठी फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. फत्तेपूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्याचा सल्ला दिला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याला जळगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
आपल्या डोळ्यांदेखत मित्राचा झालेला दुर्दैवी अंत पाहून सोबत आलेल्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचून पंचनाम्याची प्रक्रिया केली. मृत आकाशच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. घरातील एकुलता एक तरुण मुलगा अचानक गमावल्यामुळे पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भादोला परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.












