बाबो..! जामनेरच्या एसटी डेपोतून नवी कोरी बस पळवली! शहापूरजवळ पंक्चर अवस्थेत सापडली

ऑगस्ट 10, 2026 1:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२६ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नसून अशातच राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून नवीन जिजाऊ’ एसटी बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र, जामनेरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या फरशी पुलावर ही बस आढळून आली आहे. बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने संशयिताने ती तेथेच सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

stbus

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगारामधील एमएच १९, एनई ४२१४ क्रमांकाची नवी कोरी ‘जिजाऊ’ एसटी बस मध्यरात्री पळवून नेण्यात आली. ही बस आज सोमवारी सकाळी शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर एसटी महामंडळाची बस बंद अवस्थेत उभी असल्याचे दिसून आले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले. पाहणी केल्यानंतर सदर बस जामनेर आगाराची असल्याचे समोर आले. त्यानंतर बस आगारातून पळवून नेण्यात आल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक आणि वाहक वास्तव्यास आहेत. त्यांना बसबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसची पाहणी केल्यानंतर हीच बस जामनेर आगारातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना माहिती दिली.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने जामनेर आगारातून नवी कोरी बस बाहेर काढली. बस घेऊन तो जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने गेला. मात्र, खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाले. बस पुढे नेता न आल्याने संशयिताने ती तेथेच सोडली आणि घटनास्थळावरून पसार झाला. ही ‘जिजाऊ’ बस जामनेर आगारातून जळगाव-नेरी-जामनेर मार्गावर प्रवाशांच्या सेवेत धावत असते. प्रवाशांसाठी वापरली जाणारी नवी कोरी बस थेट आगारातून पळवून नेण्यात आल्याने एसटी प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. आगार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now