Breaking : शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । शिंदे गटाला निवडणुक चिन्ह देण्याबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय जाहीर केला असून शिंदे गटाला निवडणुक आयोगाने ढाल-तलावर हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे चिन्हाचा वाद तात्पुरता मिटला आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे.
निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली होती. तर, दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची हे पर्याय ठेवले होते त्यातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.
तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर मांडले होते. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल. या तिन्ही पैकी मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाल आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले होते. त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला मिळालं आहे.