जळगाव लाईव्ह न्युज | १३ मार्च २०२१ | येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते जळगाव येथील माजी महिला महानगराध्यक्षा कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पाचोरा व भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी २८ कोटीचा निधी मंजूर
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । पाचोरा- भडगाव तालुक्यातील ८० किलोमीटरचा रस्त्यांसह १ लहान पुलाच्या कामास सुमारे २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे दळण वळणाची सोय अधिक जलद होणार असून यामुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
ते आपल्या निवासस्थानी “शिवालय” येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे एवढा निधी खेचून आणण्यात आपल्याला यश आले असून याकामी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, मुकुंद बिल्दीकर, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, डॉ. हेमराज पाटील उपस्थित होते. मंजुरी मिळालेल्या कामात प्रामुख्याने पिंप्रीहाट रामा – सावदा – गुढे – वडाळी १२.५ किलोमीटरचा २.७५ कोटी रुपयांचा रस्ता, आर्वे – शिरूड – तरवाडे – पळासखेडे मध्ये लहान पुलांच्या बांधकामासाठी ५० लक्ष रुपये, भडगाव – वाक – पळासखेडा दरम्यान ३ कोटी रुपायांचा १२ किलोमीटर चा रस्ता, वाडे – गोंडगाव – कनाशी – भडगाव दरम्यान सुमारे ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा ५ किलोमीटरचा रस्ता, नांद्रा – माहेजी (कुरंगी फाटा ते माहेजी गावातील देवी मंदिरा पर्यंतचा रस्ता २ कोटी रुपयांचा रस्ता, नगरदेवळा – नेरी – भामरे दरम्यान १०किलोमीटरचा १ कोटी ६० लाख रुपयांचा रस्ता, लोहारी ते आंबेबडगाव दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५० लाखांचा रस्ता, चुंचाळे ते विष्णुनगर दरम्यान ६ किलोमीटरचा सुमारे ३ कोटी रुपायांचा रस्ता, नगरदेवळा ते निपाणे दरम्यान ६ किलोमीटरचा १ कोटी ५० लाख रुपयांचा रस्ता, गाळण ते चिंचखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा सुमारे २कोटी २५ लाख रुपयांचा रस्ता, वरसाडे ते डोकलखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा १ कोटी ८० लाख रुपायांचा रस्ता, तर लासगाव ते बांबरुड दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. अशा २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असुन लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
बिग ब्रेकिंग : जळगाव मनपाचे बँक खाते सील; महसूल विभागाने केली कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर महानगरपालिकेचे बँक खाते महसूल विभागाने सील केले आहेत. जळगाव शहर मनपाकडे अनेक वर्षापासून १३.२५ कोटी थकीत असल्याने कार्यवाही करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.
नेहमी काही न काही कारणाने चर्चेत राहणाऱ्या जळगाव मनपावर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. महसूल विभागाच्या थकीत असलेल्या १३.२५ कोटी रकमेमुळे महसूल विभागाने मनपाची बँक खाती गोठवली आहेत. ऐन कोरोनाच्या काळात कारवाई झाल्याने अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत. जळगाव उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याबाबत दुजोरा दिला असून जळगाव मनपाच नव्हे इतर देखील काही विभाग आणि कार्यालयांची खाती गोठवली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गृहविलगीकरणाचे नियम पुन्हा कठोर ; जाणून घ्या काय आहे नियम
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणाचे नियम पुन्हा कठोर केले आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ अथवा अन्य आजार असलेल्या नागरिकांना गृहविलगीकरणाची परवानगी नसेल.
जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्ह्यात बहुतांश भागात जनता कॅर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून येत आहे. शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसाचा जनता कॅर्फ्यू लावण्यात आला आहे. तरी देखील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
गृहविलगीकरणाची मान्यता अपवादात्मक स्थितीत, लक्षणे नसलेल्या व अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच मिळू शकेल. त्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील. हे निकष पूर्ण केले जात नसतील तर प्रत्येक रुग्णाने कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे आहे.
गृह विलगीकरणासाठीचे नियम
– लक्षणे सौम्य, अतिसौम्य असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे
– विहित नमुन्यात रुग्णाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या नावाचा उल्लेख असावा
– संबंधित रुग्णाच्या घरी एकच कुटुंब असावे
– गृहविलगीकरणात दोन स्वतंत्र शौचालय, बाथरुमसह चार खोल्यांचे घर असावे
– घरी रात्रंदिवस, २४ तास काळजी घेणारी व्यक्ती असावी
– या सर्व सुविधा आहेत की नाही, याची खातरजमा तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिका व मनपा स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांनी करावी
– रुग्णाने स्वतःचे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-1) भरुन द्यावे व सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रतिज्ञापत्र दिल्यांनतर सदरील व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.
-वर नमूद सर्व अटी व शर्तीचे पालन करणाऱ्या व्यक्तींना जळगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त, मनपा जळगांव तथा Incident Commander यांनी नेमून दिलेला अधिकारी परवानगी देईल. तसेच उव्वरित जळगांव जिल्हयाकरिता संबंधित उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander यांनी गृह विलगीकरणासाठी तसेच गृह उपचारासाठी परवानगी देण्याची कार्यवाही करावी.
जि.प.मध्ये कोरोनाचा धोका वाढतोय ; पुन्हा दोन कर्मचारी बाधित
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून हाॅटस्पाॅट ठरलेल्या शहरातील जिल्हा परिषदेच्या दाेन्ही इमारतीमध्ये दरराेज नवनवीन रूग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी बांधकाम विभागात आणखी दाेन कर्मचाऱ्यांना काेराेना संसर्ग झाल्याने या विभागाला प्रशासनाकडून तातडीने कुलूप लावण्यात आले.
मार्च अखेर असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या कंत्राटदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची यात्रा भरलेली असते. गेल्या दाेन महिन्यापासून या विभागात रात्री उशिरापर्यंत कंत्राटदारांची गर्दी असते. टेबलभोवती कर्मचाऱ्यासोबत ठेकेदार फाईल मार्गी लावण्यासाठी तासंतास बसून असतात. काेराेनाचा संसर्ग वाढला असतांना बांधकाम विभागातील वाढत्या गर्दीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला होता. प्रशासनाने निर्बंध लावूनही ही गर्दी कमी हाेत नव्हती. शेवटी शुक्रवारी दाेन कर्मचारी काेराेना संक्रमित झाल्याचे तपासणीमध्ये दिसून आल्यानंतर या विभागाला तत्काळ कुलूप लावण्यात आले.
विभागातील इतर कर्मचाऱ्यांना क्वाॅरंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मार्च अखेर असल्याने बहुतांश सदस्य आणि ठेकेदारांची कामे याच विभागाशी निगडीत होती. सकाळीच हा विभाग बंद करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने काहीशी गर्दी ओसरली होती.जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यालय कुलूप लावून बंद केलेले आहे.
दुचाकी-ट्रकची समोरासमोर धडक ; तरुण ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ दुचाकी व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
शेमळदे येथील अश्विन रवींद्र भालेराव (वय २३) हा दुचाकी (एमएच- १९, सीके- ८१३९)ने मुक्ताईनगरडे येत होता. खामखेडा पुलाजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (टीएस- १६, यूसी- ४७१७)ने त्यास धडक दिली. या अपघातात अश्विन भालेराव गंभीर जखमी झाला.
जळगाव येथे उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. मृत अश्विन हा मुक्ताईनगर येथे बी. एसस्सी.च्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील आर. जी. भालेराव हे रावेर पंचायत समिती, तर आई अंगणवाडी सेविका आहे.
वर्षभरापासून रेल्वे पॅसेंजर बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सर्व रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. परिणामी अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
भुसावळ, जळगाव येथून सुरतकडे जाणारे अनेक प्रवासी असतात. त्यात नोकरीच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो आहे.
या पार्श्वभूमीवर डीआरएम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल. तसेच रेल्वे मंत्र्यांनाही एक निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते जगन सोनवणे यांच्याकडून कळवण्यात आले.
गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !
माजी मंत्री आणि जळगाव मनपातील भाजपचे नेते गिरीषभाऊ तुम्हाला कोरोनामुक्त रामराम. तुम्ही नशिबवान आहात, अजून एकदाही कोरोना तुमच्याकडे फिरकला नाही. आमच्या सारखा सामान्य माणूस ‘पुन्हा येईन पुन्हा येईन’ च्या धास्तीने मानसिक कोरोनाग्रस्त झालेला आहे. पुन्हा येण्याच्या भीतीने कोरोनासोबतच फडणवीसची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. आजकाल कोण कोरोना सोबत आणि कोण फडणवीस विरोधात हे सुद्धा समजत नाही. पण तुम्ही फडणवीस सोबत कायम आहात. फारच लकी आहात. ना सीडीची भीती ना ईडीची चिंता.
गिरीषभाऊ, असे कळले की, जळगाव मनपातील भाजपमध्ये महापौर बदलाची टूम सुरू आहे म्हणे. मनपातील भाजपचे कर्ताकरविता आपणच आहात. जळगाव शहराला विधानसभेचा भाजपचा आमदार व लोकसभा मतदार संघाला भाजपचा खासदार निवडून आणायचे श्रेय आता तुमचे एकट्याचेच. मनपा ते दिल्ली व्हाया मुंबई आणि रिटर्न जामनेर अशी भाजपची सत्ता आहे. माफ करा गिरीषभाऊ, कोरोना संसर्गाचा विषाणू मागील वर्षी अवतरला आणि त्याने माणसांची वाट लावली. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपला भरभरून यश देणाऱ्या जळगाव शहराला मात्र असुविधांचा कोरोना गेल्या ७/८ वर्षांत लागला आहे. मनपात सुद्धा फारसे काही चांगले घडले नसते. जर कोरोना काळात विद्यमान महापौर भारतीताई सोनवणे आणि स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वतःचा जीव तळ हातावर घेऊन बाहेर पडले नसते तर…
जळगाव मनपातील कार्यपद्धती रसातळाला गेली होती. हॉटेलातून डबे मागवून खाणे आणि खाता-खाता इतरांना शिव्या घालणे सुरू असायचे. २५ कोटी रुपये निधी खर्चाचा घोळ व पत्रापत्री नागरिकांना माहिती आहे. वॉटरग्रेसचा ठेका का काढला, तो पुन्हा का दिला ? हे सुद्धा जळगावकरांना माहिती आहे. रस्ता तयार करण्यापूर्वी रस्ते दुभाजक तयार होणारे जळगाव हे एकमेव शहर आहे. या दुभाजकांचा मूळ ठेकेदार कोण ? दुसरा कोण ? तिसरा कोण ? इथपर्यंतची चर्चा जळगावकरांना माहिती होते. नाल्यावर पूल बांधलेला आहे, तरीही त्याच्या बांधकामाचे टेंडर निघते. शिवाजीनगर ते जिल्हा परिषद भागात वीज जोडणीच्या टेंडरमधील हिस्सेदारीतून ८/१० नगरसेवक भांडतात. टोळके करून फिरणारे आणि प्रत्येक कामात हिस्सेदारीसाठी धावणारे यापूर्वी काही छायाचित्रात दिसले आहेत. सफाई ठेकेदाराकडून दरमहा १५ हजार रुपये मिळतात अशा संभाषणाच्या आॕडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसने शेअर केल्या आहेत. असा कित्ती-कित्ती पंचनामा करायचा.
उपरोक्त बदनामीच्या गदारोळात गेल्या वर्ष-दीड वर्षात महापौर म्हणून भारतीताई सोनवणे यांची कारकिर्द आश्वासक ठरली आहे. जळगाव शहर कोरोना रुग्ण संख्येत देशात अव्वलस्थानी होते. तेव्हापासून सोनवणे दाम्पत्य स्वतःच्या जीवाची वा कुटुंबाची पर्वा न करता धावधाव धावत आहेत. कैलास सोनवणे यांच्याकडे सोपवलेली तक्रार काही तासात मार्गी लागते. गल्लीबोळात फिरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणारी सोनवणे यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा आढावा सुद्धा घेते आणि आढावू घटकांना ठिकाणावरही आणू शकते. कोरोना उपचार केंद्रात वर्षभरात सोनवणे दाम्पत्याने दिलेला वेळ हा घरी मुला-बाळांसाठी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त आहे. केंद्रातील नास्ता, जेवण, सोय, सुरक्षा याचा अनुभव सोनवणे दाम्पत्य वारंवार घेत असते. मनपातील सर्वच विभाग अधिकारीही सध्या तत्परतेने काम करीत आहेत.
जळगावकरांसाठीच्या अशा आश्वासक वातावरणात दाद मागण्याची एक जागा महापौर भारतीताई सोनवणे यांच्या कक्षात आहे. तेथे अवेळी नेतृत्व बदलाची घाई गिरीषभाऊ तुमच्या सारख्या चाणाक्ष नेत्याने मुळीच करायला नको. ‘वर्ष भरात जळगाव बदलून दाखवतो’ हे म्हणणे जसे कृतीतून करायला अवघड आहे तसेच खूर्चीसाठी ‘भाऊ मला महापौर करा’ अशा अपेक्षा इतरांनी करणे गैर नाही. पण नेता म्हणून तुम्ही कठोरपणे सांगायला हवे, ‘कोरोनाचा हा काळ जात-समाज याचे गणित पाहून महापौर नियुक्तीचा नाही. आताच्या संकटात स्वतः जगून इतरांनाही जगवायची धडाडी असलेलाच महापौर हवा. सध्या तरी भारतीताई सोनवणे या तसे काम करीत असताना त्यांना पुढे चाल देण्यात काय हरकत आहे ?’ या शहराने दर सहा महिन्यांनी बदललेले महापौर पाहिले आहे. आज त्यांना लग्नपत्रिका देताना कोणीही माजी महापौर असे लिहित नाही. एवढे त्या पदाचे अवमूल्यन झाले आहे. जास्त लिहायची गरज नाही. बाकी माणसांचा, जात-समाजचा लेखाजोखा तुमच्याकडे आहेच.
– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार
(सदर पोस्ट तुम्ही जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्या फेसबुक वॉलवर देखील वाचू शकता.)
दुर्दैवी : पती-मुलाच्या आत्महत्येनंतर महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने गुरुवारी दीपक रतिलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पूत्राने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आदर्शनगरात उघडकीस आली होती. दरम्यान, आता दुर्दैवी बाब अशी की उपचारादरम्यान पत्नीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रध्दा दीपक सोनार (वय-६०) असे मृत महिलेचे नाव आहे.
आदर्श नगरात प्लॉट क्रमांक १९० येथे दीपक सोनार हे आपल्या पत्नी आणि मुलगासह राहत होते. दरम्यान, मागील गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी न्यूमोनियामुळे एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे दोन दिवसात दीपक सोनार यांचे जावाई रूपेश सोनार आणि मुलगी रूपाली सोनार यांनी दीड लाख रुपये रोख कॅश भरली होती. प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांना ५ लाख रुपये भरण्यासाठी सांगितले होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असल्याने नातेवाईकांकडून बोलले जात आहे. दुपारी मुलगी रूपाली यांनी वडील दीपक सोनार यांना घरी जाण्यास सांगितले होते.
सायंकाळी जावाई व मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आदर्शनगरातील घरी आले. वडील दीपक सोना व भाऊ परेश सोनार यांचे मृतदेह त्यांना आढळून आल्याने रूपालीने एकच आक्रोश केला. याबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काल शुक्रवारी सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. त्यातच उपचारार्थ दाखल असलेल्या श्रध्दा सोनार यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आदर्श नगरातील सोनार कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.